
संजय तिवारी, प्रतिनिधी
नागपुरातील (Nagpur Crime News) वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती चारित्र्यावर संशय घेत नेहमी शिवीगाळ करायचा आणि टोचून बोलत होता. पत्नीच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत होता. पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीने प्लान आखला. पतीच्या हत्येला नैसर्गिक मृत्यूचे स्वरूप देण्याचा प्रयत्न पोस्टमॉर्टम अहवालातून उघड झालं आहे. 38 वर्षीय चंद्रसेन रामटेके असे मृताचे नाव आहे. (Nagpur wife killed husband)
मिळालेल्या माहितीनुसार, दिशा रामटेके (30 वर्षे) हिचं चंद्रसेन यांच्याशी तेरा वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांना दोन मुली आणि एक सहा वर्षांचा मुलगा आहे. काही वर्षांपूर्वी चंद्रसेन याला अर्धांगवायूचा झटका आला होता. घराचा खर्च भागविण्यासाठी दिशा पाण्याची कॅन भरून विक्रीचा व्यवसाय करत असे. काही महिन्यांपूर्वी तिची आसिफ इस्लाम अन्सारी उर्फ राजाबाबू टायरवाला या दुचाकी दुरुस्ती आणि पंक्चरचे काम करणाऱ्या व्यक्तीशी असलेली ओळख झाली. काही दिवसात ह ओळख प्रेमसंबंधात बदलली.
नक्की वाचा - Melghat News : 10 दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार, पोटावर गरम विळ्याचे 39 चटके, मेळघाटातील वृद्धेविरोधात पोलिसात तक्रार
4 जुलै रोजी पती चंद्रसेन आणि दिशा यांच्यामध्ये अनैतिक संबंधावरुन कडाक्याचं भांडण झालं. त्यावेळी दिशाने पतीला संपवण्याचा प्लान आखला. शुक्रवारी दुपारी चंद्रसेन घरी झोपेत असताना दिशा हिने आसिफला घरात घेतलं. दोघांनी चंद्रसेन याचा गळा आवळला आणि नाका तोंडावर उशी दाबून धरली. श्वास गुदमरून तडफडून चंद्रसेन याचा मृत्यू झाला. यानंतर चंद्रसेन याच्या पोस्टमार्टममुळे हा सर्व प्रकार उघड झाला. त्याच्या पोस्टमॉर्टम अहवालात गळा, नाक आणि तोंड दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे उघड झाल्याने तपासाची दिशा बदलली. पोलिसांनी दिशा ची चौकशी केल्यावर तिने हत्येची कबुली दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world