जाहिरात

नागपूरच्या दिव्यांग ईश्वरीने रचला जागतिक विक्रम; 11 तास 15 मिनिटांचा संघर्ष, जेलीफिशचा दंश अन् रौद्र समुद्र

Nagpur News: नागपूरची दृष्टीहीन जलतरणपटू ईश्वरी पांडे हिने श्रीलंकेतील तलाईमन्नार ते धनुष्कोडी ही पाल्क सामुद्रधुनी 11 तास 15 मिनिटांत पार करत जागतिक विक्रम प्रस्थापित केला. वाचा तिच्या या थरारक प्रवासाची कथा.

नागपूरच्या दिव्यांग ईश्वरीने रचला जागतिक विक्रम; 11 तास 15 मिनिटांचा संघर्ष, जेलीफिशचा दंश अन् रौद्र समुद्र
"Nagpur News: नागपूरच्या ईश्वरी पांडेचा जागतिक विक्रम"

- प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी

Nagpur News: इच्छाशक्ती प्रबळ असेल तर शारीरिक मर्यादा यशाच्या आड येऊ शकत नाहीत, हे नागपूरच्या ईश्वरी पांडे हिने जगाला दाखवून दिले आहे. पूर्णतः दृष्टीहीन असतानाही ईश्वरीने श्रीलंकेतील तलाईमन्नार ते भारतातील धनुष्कोडी ही पाल्क सामुद्रधुनी पोहून यशस्वीपणे पार केली. या जागतिक विक्रमानंतर नागपुरात तिचे आगमन झाले असता स्थानिकांनी तिचे अभूतपूर्व आणि शाही स्वागत केले.

11 तासांचा थरारक संघर्ष

ईश्वरीने हे अंतर पार करण्यासाठी सलग 11 तास 15 मिनिटे समुद्राच्या लाटांशी झुंज दिली. समुद्राचे रौद्र रूप, अंगाला डसणारे जेलीफिश आणि प्रचंड वेगाने येणाऱ्या लाटा अशा अनेक आव्हानांचा तिने सामना केला. डोळ्यांनी दिसत नसले तरी केवळ जिद्द आणि सरावाच्या जोरावर तिने या अथांग सागराला गवसणी घातली. तिच्या या कामगिरीची नोंद आता जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे.

नागपुरात गुलालाची उधळण आणि घोड्यावरून मिरवणूक

ईश्वरीचे नागपुरात आगमन होताच वातावरण उत्साहाने भारावून गेले होते. मेडिकल चौक ते ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयादरम्यान तिची घोड्यावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. पुष्पवर्षाव, गुलालाची उधळण करत ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीने संपूर्ण नागपूरकरांचे लक्ष वेधून घेतले होते.

(नक्की वाचा: Success Story: कृषी सेवक ते सहाय्यक आयुक्त.. अकोल्याच्या लेकीची यशस्वी झेप; संघर्षातून मिळवलं यश!)

अशक्य ते शक्य करण्याची जिद्द

ईश्वरीने केवळ समुद्र पार केला नाही, तर जगासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. दृष्टीहीन व्यक्तीही साहसी क्रीडा प्रकारात जागतिक विक्रम करू शकते, हे तिने सिद्ध केले. तिने मिळवलेले हे यश केवळ नागपूरचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे नाव उज्ज्वल करणारे आहे. "स्वप्नांना किनारा नसतो, पण जिद्द असेल तर अशक्य वाटणारे किनारेही गाठता येतात," हाच संदेश ईश्वरीच्या या कामगिरीतून सर्व तरुणांना मिळाला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर ईश्वरीवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com