Nagpur News: नागपूर जिल्ह्यात देवलापार परिसरात छवारी शिवारात वाघाच्या भीतीने झालेल्या धावपळीत बंधाऱ्याच्या पाण्यात पडून पिता-पुत्राचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. 36 वर्षीय जीवन धर्मदास कोकोडे आणि त्यांचा इयत्ता दुसरीत शिकणारा 7 वर्षीय मुलगा जतीन जीवन कोकोडे अशी मृतांची नावे आहेत.
बाप-लेकाचा मृत्यू, परिसरात हळहळ
समोर आलेल्या माहितीनुसार, जीवन कोकोडे हे त्यांचा मुलगा जतीन आणि साळा संजय उईके यांच्यासह छवारी शिवारातील लखन बंधाऱ्याजवळील शेतात गेले असताना त्यांना पट्टेदार वाघ दिसल्याने जीव वाचविण्यासाठी पळापळ होऊन ही दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती मिळताच देवलापार पोलीस ठाण्याचे ठाणेदार नारायण तुरकुंडे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी शेषराव टुले यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत बचाव व पंचनामा प्रक्रिया पूर्ण केली.
घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असता घटनेचे गांभीर्य आणि वाघाच्या पायांचे ठसे लक्षात घेऊन, वनविभागाने मृत पिता-पुत्राच्या वारसांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली असून तातडीची मदत म्हणून 50 हजार रुपये सुपूर्द केले. तसेच वारसांना नोकरी देण्याची शिफारस करण्यात येणार असल्याचे सहायक वनसंरक्षक यांनी सांगितले. या घटनेमुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र भीती व संताप व्यक्त होत असून वन्य जीवांच्या त्रासामुळे नागरिकांत घबराट पसरली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world