Navi Mumbai Cyber Fraud: नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्याने ऑनलाइन आर्थिक गुन्ह्यांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ११ कोटी ४८ लाख २३ हजार ७३३ रुपयांच्या ऑनलाइन फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी वापरण्यात आलेल्या 'म्युल बँक अकाउंट' धारक आणि वापरकर्त्यांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ३१७(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
Nashik Crime: दुहेरी हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला! पत्नी, मुलाची निर्घृण हत्या, पतीने विष घेतलं
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ नोव्हेंबर २०२५ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत देशभरातील विविध ऑनलाइन फसवणुकीतून मिळालेली रक्कम आरोपींनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये जमा करून तिचा अपहार केला. या व्यवहारांमध्ये फिनो पेमेंट्स बँक, माईडस्पेस, जुईनगर, नवी मुंबई येथील काही खात्यांचाही वापर झाल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे संबंधित खातेधारक आणि त्या खात्यांचा वापर करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात आली असून, तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. ऑनलाइन व्यवहाराशी संबंधित गुन्हा असल्याने घटनास्थळ पंचनामा किंवा फॉरेन्सिक व्हॅनची आवश्यकता भासली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आरोपींचा शोध सुरू असून, बँक व्यवहार, मोबाईल क्रमांक, केवायसी कागदपत्रे आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.
सायबर गुन्हेगार फसवणुकीतून मिळालेली रक्कम लपवण्यासाठी इतर व्यक्तींची बँक खाती वापरतात. काही जण कमिशनच्या मोबदल्यात स्वतःचे खाते वापरण्यास देतात, तर काहींची कागदपत्रे वापरून खाती उघडली जातात. अशा खात्यांना 'म्युल अकाउंट' म्हटले जाते. अशा खात्यांचा वापर करणे किंवा करून देणे हा देखील गुन्हाच आहे.
पोलिसांनी केले महत्त्वाचे आवाहन...
दरम्यान, नवी मुंबई सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. कोणालाही स्वतःचे बँक खाते, एटीएम कार्ड, चेकबुक किंवा इंटरनेट बँकिंगची माहिती देऊ नका. कमिशनच्या आमिषाला बळी पडून बँक खाते भाड्याने देऊ नका. अनोळखी लिंक, गुंतवणूक योजना किंवा नोकरीच्या नावाखाली पैसे स्वीकारू नका. कोणतीही सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधा किंवा www.cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवा. सायबर पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आणि आर्थिक व्यवहार करताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world