जाहिरात

Ajit Pawar Speech : कार्यकर्त्यांना इशारा, अधिकाऱ्यांना दम; बीडमधील सभेतून अजित पवार थेट बोलले

Ajit Pawar Beed Speech : कुणी चुकीचे काम केले असेल अन् त्याचे धागेदोरे लांबपर्यंत पोहचत असतील तर त्याची पाठराखण करणार नाही", असा इशाराच अजित पवारांना कार्यकर्त्यांना दिला. 

Ajit Pawar Speech : कार्यकर्त्यांना इशारा, अधिकाऱ्यांना दम; बीडमधील सभेतून अजित पवार थेट बोलले

विनोद जिरे, बीड

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. अजित पवारांनी जाहीर भाषणातून बीडमधील अधिकाऱ्यांना दम भरला आहे. बीडमधील काही अधिकारी बदलावे लागतील, असे संकेत देखील अजित पवार यांनी दिले. कार्यकर्त्यांचे देखील कान टोचत दादागिरी करणाऱ्यांना माफ करणार नाही असा दम भरला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील कायदा सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर आता अजित पवारांनी आक्रमक भूमिक घेतली आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नेत्यांच्या जीवावर उडणाऱ्या कार्यकर्त्यांना उद्देशून अजित पवारांनी म्हटलं की, "तुम्हाला वाटत असेल माझा नेता वरच्या पदावर आहे, आपलं काही होणार नाही. मी फार पोहचलेलो आहे, कृपया अशी भाषा करू नका. एकदा अडकला तर त्याची अंडी पिल्ली बाहेर निघतात. मी दादागिरी खपवून घेणार नाही. मी कुणाची बदनामी खपवून घेणार नाही. कुणी चुकीचे काम केले असेल अन् त्याचे धागेदोरे लांबपर्यंत पोहचत असतील तर त्याची पाठराखण करणार नाही", असा इशाराच अजित पवारांना कार्यकर्त्यांना दिला. 

(नक्की वाचा- Shivsena vs MNS : गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचे काय? शिवसेनेचा राज ठाकरेंवर निशाणा)

"पक्षात कुणाला घेत असताना थोडं त्यांचे रेकॉर्ड पाहायला हवं. आपल्या अवती-भोवती चुकीची प्रवृत्ती असली नाही पाहिजे. पोलीस अधीक्षकांना फोन करून काही रेकॉर्ड तपासले आहेत. उगीच एखादी गोष्ट हलक्यात घेतली तर त्याची किंमत पक्षाला आणि त्या नेतृत्वाला देखील मोजावी लागले", असं अजित पवार म्हणाले.

बीडला विकासाच्या वाटेवर न्यायचंय

अजित पवारांनी तरुणांना उद्देशून म्हटलं की, "बीड ही देवदेवतांची भूमी आहे. चुकीचे काम करू नका. तरुणांना माझे आवाहन आहे की चुकीच्या प्रवृत्तींना खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला तर त्यापासून दूर राहा. रावणाला सुद्धा धडा शिकवण्याची ताकद या बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये आहे. मात्र काही दिवसांपासून बीड जिल्ह्याच्या मातीची बदनामी सुरू आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याला पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर नेण्याचं काम आपल्याला करावे लागणार आहे. राखीची गँग, वाळूची गँग या सर्व गँगला आता आपल्याला सुतासारखे सरळ करायचं आहे", असं देखील अजित पवारांनी म्हटलं.

(नक्की वाचा- Beed News : "...आता सहनशीलता संपली", अजित पवारांच्या दौऱ्यादरम्यान शिक्षक ढसढसा रडला)

अजित पवारांचा अधिकाऱ्यांना दम 

बीडमध्ये अनेक अधिकारी वर्षानुवर्षे तिथेच तळ ठोकून बसले आहेत. यावर बोलताना अजित पवारांनी म्हटलं की,"बीडमधील काही अधिकारी बदलावे लागणार आहेत, ते निगरगट्ट बनले आहेत. मी पुढच्यावेळी आलो तर त्यांच्याकडे बघवच लागणार आहे. काही अधिकारी बऱ्याच वर्षांपासून इथेच बसले आहेत. जे इथून हलायला तयार नाहीत त्यांना इथून हलावावं लागेल. अधिकाऱ्यांनीही त्यांची जबाबदारी पार पाडली पाहिजे. अधिकाऱ्यांनी त्यांच काम दाखवावं."

पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत

"मी जाहीरपणे सांगतो आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत. तुम्ही गुरूंच्या पाया पडा. आई-वडिलांच्या पाया पडा. पण राजकीय नेत्यांच्या पाया पडू नका. माझ्याही पाया पडू नका. तुम्ही उगीच कोणाच्या पाया पडू नका, मग त्यात लाचारी पत्करल्यासारखं वाटतं, अशी स्पष्टोक्ती अजित पवारांनी केली. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: