जाहिरात

NCP News: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास सत्तेचा अडसर; शरद पवारांच्या आमदारांचं म्हणणं काय?

एकीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार, खासदार आणि काही बडे नेते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास तयार असताना, आमदार उत्तम जानकर यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायचे असतील तर अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल.

NCP News: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास सत्तेचा अडसर; शरद पवारांच्या आमदारांचं म्हणणं काय?

संकेत कुलकर्णी , पंढरपूर

महापालिका निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात आहेत. जिल्हा परिषद निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढतील यासाठी चर्चा देखील सुरु आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्येमध्येच याबाबत एकमत नसल्याचे दिसून आले आहे.  

उत्तम जानकरांची भूमिका

ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणानंतर आणि महापालिकेच्या निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, याबाबत जोरदार चर्चा आहेत. तशा बैठकाही झाल्या. मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायचे असतील तर अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल, अशी भूमिका शरद पवारांच्या आमदारांची आहे.  अशा परिस्थितीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास सत्तेचा अडसर येतोय की काय? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. 

(नक्की वाचा-  BMC Election : मुंबईत अमराठी नगरसेवकांची संख्या वाढली; सर्वाधिक भाजपचे, गुजराती किती?)

अभिजीत पाटलांची भूमिका

तर दुसरीकडे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार अशा दोन्ही नेत्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून निवडणूक लढवली. यानंतर सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. याबाबतचा निर्णयही झाला. तशी माहिती थेट शरद पवारांचे माढाचे आमदार अभिजीत पाटील यांनी दिली. घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास आम्ही तयार असल्याचेही ते म्हणाले. 

एकीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार, खासदार आणि काही बडे नेते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास तयार असताना, आमदार उत्तम जानकर यांनी वेगळी भूमिका मांडली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायचे असतील तर अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल. अजित पवार सत्तेतून बाहेर न पडल्यास बिर्याणीत गुळवणी ओतल्या सारखे होईल, असे विधान करत जानकरांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेत नवा ट्विस्ट आणला आहे. 

(नक्की वाचा-  Mumbai News: मुंबईत उभारले जाणार 30 मजली 'बिहार भवन'; जागा आणि बजेटही ठरले)

उत्तम जानकरांच्या आणि अभिजीत पाटील अशा शरद पवारांकडे दोन आमदारांच्या वेगवेगळ्या भूमिका निश्चितच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना अडसर ठरणाऱ्या आहेत. परिणामी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास आता शरद पवारांच्या गटामध्येच फूट पडल्याचेही चित्र आहे.  अजित पवार आणि शरद पवार यांना एकत्र आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या अंतर्गत लॉबीतून मोठे प्रयत्न आहेत. मात्र नेत्यांकडून अशा विरोधी भूमिका येत असतील तर अशावेळी शरद पवारांचा शब्द अंतिम असेल .
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com