जाहिरात
This Article is From Jun 11, 2024

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा फूट? बजरंग सोनावणेंबाबत अमोल मिटकरींचा मोठा दावा

बजरंग सोनावणे आणि अजित पवार यांच्यात 10-15 मिनिट चर्चा झाल्याची देखील माहिती मिटकरी यांनी दिली आहे. त्यामुळे बजरंग सोनावणे अजित पवारांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा फूट? बजरंग सोनावणेंबाबत अमोल मिटकरींचा मोठा दावा

बीड लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केल्याचा दावा आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. बजरंग सोनावणे आणि अजित पवार यांच्यात 10-15 मिनिट चर्चा झाल्याची देखील माहिती मिटकरी यांनी दिली आहे. त्यामुळे बजरंग सोनावणे अजित पवारांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

(वाचा- बारामतीचे 'दादा' बदला!, विधानसभेला युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार सामना रंगणार?)

अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत म्हटलं की, "बीडच्या बप्पाचा दादांना फोन. #मोठ्यामनाचादादा"

अमोल मिटकरी यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, "बीडमधील एका बप्पांचा अजितदादांना सकाळी फोन आला होता. दादा मला आता संकटातून वाचवा असं ते म्हणत होते. त्या अनुषंगानेच मी ते ट्वीट केलं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, महाराष्ट्रात जनतेची कामे करणारा नेता म्हणून अजितदादांची ओळख आहे. विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत खूप बदनामी केली, खालच्या पातळीवर टीका करण्याचा प्रयत्न केला." 

(नक्की वाचा- महाराष्ट्रातील नेता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी? कोणकोणत्या नावांची चर्चा?)

"मात्र विजयोत्सव साजरा करणारे नेते जेव्हा अजितदादांना विचारतात की आमचं भविष्य कसं? त्यावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान वाटतो की मी त्या नेत्यासोबत आहे, जे नेते तळागळातील लोकांसाठी काम करतात", असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. 

काय म्हणाले बजरंग सोनावणे?

बजरंग सोनावणे यांनी हा दावा फेटाळला आहे. मी फोन करण्याचा संबंध नाही. ते असा संभ्रम का पसरवत आहेत, हे त्यांनाच विचारायला हवं. अमोल मिटकरी अतिशय चुकीचं करत आहेत. मिटकरींना माझी विनंती आहे की, ते आमदार झालेत ते थेट झाले आहेत. आता त्यांना पक्षाने काय पद दिलंय, मला माहित नाही. त्यांनी एकदा जनतेतून निवडून यावं आणि त्यानंतर दुसऱ्यांवर बोलावं, ही माझी विनंती आहे. मी जिवंत असेपर्यंत मी शरद पवार साहेबांसोबतच राहणार', असंही बजरंग सोनवणे यांनी म्हटलं. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: