
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 26 वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. मात्र वर्धापनदिनीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला दोन मोठे हादरे बसले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटाल धक्का बसला आहे. सांगलीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते वैभव पाटील आणि साताऱ्यातील सत्यजित पाटणकर यांनी भाजपाची वाट धरली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सांगलीच्या विट्याचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवानेते वैभव पाटील भाजपात दाखल होणार आहेत. मुंबईमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत वैभव पाटील आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश करणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
(नक्की वाचा- Political News : स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची फसवणूक? मंत्री संजय शिरसाटांवर आणखी एक आरोप)
वैभव पाटील हे माजी आमदार सदाशिव पाटील यांचे सुपुत्र असून नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक देखील लढवली होती. मात्र निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता.
सत्यजित पाटणकर भाजपमध्ये जाणार असल्याची काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती. भाजपमध्ये जाण्याच्या अनुषंगाने सोमवारी पाटणकरांची कार्यकर्त्यासमवेत बैठक पार पडली. सत्यजीत पाटणकर हे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र आहेत. तर सत्यजित पाटणकर हे शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांचे प्रतिस्पर्धी मानले जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये सत्यजित पाटणकरांचा प्रभाव दिसू शकतो.
(नक्की वाचा :आषाढी एकादशीपर्यंत राष्ट्रवादीमध्ये मोठी घडामोड घडणार? 'या' नेत्याच्या संकेतामुळे एकच खळबळ)
सत्यजित पाटणकर सध्या सातारा जिल्हा बँकेचे संचालक आहेत. आज मुंबईत प्रदेश कार्यालयात होणाऱ्या कार्यक्रमात भाजपात प्रवेश करणार आहेत. रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. सातारा जिल्ह्यात भाजपाकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाला सत्यजितसिंह पाटणकर यांच्या रूपाने देण्यात आलेला सर्वात मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world