जाहिरात
Story ProgressBack

शंभुराज देसाई गट नाराज? रातोरात उदयनराजेंचं तैलचित्र कोणी केलं गायब?

लोकसभा निवडणुकीत याचा फटका बसू नये म्हणून चित्र पुसून 'डॅमेज कंट्रोल'चा प्रयत्न केल्याचं मानलं जात आहे.

Read Time: 3 min
शंभुराज देसाई गट नाराज? रातोरात उदयनराजेंचं तैलचित्र कोणी केलं गायब?
सातारा:

प्रतिनिधी, सुजित आंबेकर

साताऱ्यात शंभूराज देसाई यांच्या घराबाहेरील भिंतीवरील महायुतीचे साताऱ्याचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या तैलचित्रामुळे वादंग टाळण्यासाठी रातोरात हे तैलचित्र पुसण्यात आल्याचं समोर आलं आहे. लोकसभा निवडणुकीत याचा फटका बसू नये म्हणून चित्र पुसून 'डॅमेज कंट्रोल'चा प्रयत्न केल्याचं मानलं जात आहे.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर उदयनराजे भोसले आणि त्यांच्या कार्यकर्तेंकडून शंभुराज देसाई यांच्या गटावर अन्याय केल्याची पोस्ट व्हायरल झाली होती. सातारा लोकसभेसाठी महायुतीतून उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी एका जाहीर सभेत या लोकसभेत सातारा आणि पाटण तालुक्यातील मतदार निर्णायक भूमिका बजावतील अशी शक्यता व्यक्त केली होती. पाटण मतदारसंघात पालकमंत्री शंभुदेसाई यांचा वचक आहे. मात्र उदयनराजेंच्या पहिल्याच प्रचारात पालकमंत्री देसाई यांना डावललं गेल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यामध्ये देसाई यांच्या बंगल्याजवळील उदयनराजेंचं तैलचित्र आणि सातारा येथील लोकनेते बाळासाहेब देसाई यांचं स्मारक असे मुद्दे देसाई गटाच्या नाराजीचं कारण असल्याचं सांगण्यात आलं. या पोस्टनंतर हा वाद आणखी वाढू नये त्यापूर्वीच उदयनराजेंचं तैलचित्र पुसण्यात आल्याचा अंदाज आहे. 

नेमकं काय घडलं? 
सातारा शहरात पोवई नाक्यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे घर आहे. या घराच्या बाजूलाच असलेल्या मोठ्या इमारतीच्या भिंतीवर काही महिन्यांपूर्वी खासदार उदयनराजे यांच्या प्रेमापोटी एका चित्रकाराने त्यांचे भव्य तैलचित्र रेखाटले होते. त्या वेळेपासूनच ते तैलचित्र वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. चित्र काढतानाच त्याला पोलिसांकडून अटकाव करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्यावेळी दोन पावले मागे घेण्याची भूमिका देसाई यांना घ्यावी लागली होती. पण दररोज घरातून बाहेर पडताना देसाई यांना ते चित्र पहावं लागत होतं. 

हे ही वाचा-'उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय'; राधाकृष्ण विखे पाटलांची टीका

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने याचा हिशेब करण्याची संधी देसाई गटाने उघडपणे साधल्याचे मागील दोन-चार दिवसातील घटनांवरून बोलले जात आहे. उदयनराजे भोसले यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली. मात्र पाटण तालुक्यात त्यांनी घेतलेल्या मेळाव्यास देसाई गटाला डावलले गेल्याचे तत्कालिक निमित्त पुढे करून उदयनराजे यांना अडचणीची ठरेल अशी एक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्या पोस्टमध्ये शंभूराज देसाई यांच्या घराबाहेरील उदयनराजेंचे भव्य तैलचित्र तसेच साताऱ्यात लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाला सुरुवातीला झालेला विरोध याचा उल्लेख आहे. या पोस्टचा मास्टर माईंड कोण, हे उघड गुपित असल्याचे बोलले जात आहे. 

या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाईंच्या घराबाहेरील भिंतीवरील तैलचित्र रातोरात पुसण्यात आलं आहे. आचारसंहिता लागू होताच हे चित्र पडदा टाकून झाकून ठेवले होते. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर या तैलचित्रावरील वाद टाळण्यासाठी रातोरात तैलचित्र पांढरा रंग दिल्याचं पाहायला मिळालं. याबद्दल सातारकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. उदयनराजे यांना लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियावरील हा इश्यू प्रतिकूल ठरेल असे वातावरण तयार झाल्याने चित्र पुसले गेल्याची चर्चा आहे. हा सर्व महायुतीतलाच विसंवाद असला तरी त्याचा फटका निवडणुकीत बसू नये म्हणून ही काळजी घेतली गेली असल्याचे दिसते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination