जाहिरात

Mumbai CNG Problem: मुंबईत सीएनजी मिळण्यास प्रॉब्लेम होतोय? 'हे' आहे कारण

महानगर गॅस लिमिटेड (MGL) च्या वडाळ्यातील सिटी गेट स्टेशनवर होणारा गॅस पुरवठा बाधित झाला आहे.

Mumbai CNG Problem: मुंबईत सीएनजी मिळण्यास प्रॉब्लेम होतोय? 'हे' आहे कारण
मुंबई:

Mumbai CNG PNG Problem: नवी मुंबईजवळील उरण येथील ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) च्या वायू प्रक्रिया प्रकल्पात मोठी आग लागल्याने मुंबईतील गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. या आगीमुळे महानगर गॅस लिमिटेड (MGL) च्या वडाळ्यातील सिटी गेट स्टेशनवर होणारा गॅस पुरवठा बाधित झाला आहे. मुंबईतील अन्य सीएनजी स्टेशनवरील गॅस पुरवठाही प्रभावित होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

नक्की वाचा: डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींवरील संकट तुर्तास टळलं

PNG पुरवठा सुरळित ठेवण्यास प्राधान्य

महानगर गॅस लिमिटेडने (MGL) तातडीने परिस्थितीची गंभीर दखल घेत, घरगुती वापरासाठी असलेल्या पीएनजी (पाइप्ड नॅचरल गॅस) ग्राहकांचा पुरवठा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू ठेवण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यामुळे मुंबईतील घरांमध्ये गॅसची सेवा अखंडित राहील, अशी ग्वाही कंपनीने दिली आहे. मात्र, कमी झालेल्या दाबामुळे सीएनजीचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईतील लाखो वाहनचालक आणि सीएनजीवर चालणाऱ्या सार्वजनिक वाहतुकीला मोठा फटका बसू शकतो. रिक्षा, टॅक्सी आणि बेस्ट बसच्या सेवेवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

CNG पुरवठा विस्कळीत का झाला ?

सोमवारी दुपारी सुमारे 3 वाजता ओएनजीसीच्या उरण प्लांटमध्ये ही आग लागली. त्यानंतर ओएनजीसीच्या अग्निशमन दलाने तातडीने कार्यवाही करत सुमारे 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग पूर्णपणे विझवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कुणीही जखमी झाले नाही.

नक्की वाचा: दसरा, दिवाळीसाठी तिकीट काढायला विसरलात? 'या' पद्धतीनं मिळेल कन्फर्म तिकीट, वाचा संपूर्ण प्रोसेस

परिस्थिती पूर्ववत होण्यास वेळ लागणार

आगीनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने पाऊले उचलली गेली असली तरी, गॅसचा पुरवठा पूर्ववत होण्यासाठी काही काळ लागू शकतो. एम.जी.एल.ने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, ‘ओएनजीसीच्या उरण येथील वायू प्रक्रिया सुविधेत बिघाड झाल्याने एम.जी.एल.ने घरगुती वापरासाठीच्या गॅस पुरवठ्याला अर्थात पीएनजी ग्राहकांना अखंडित पुरवठा करण्यास प्राधान्य दिले आहे. मात्र, कमी झालेल्या दाबामुळे मुंबईतील सीएनजी सेवा प्रभावित होऊ शकते.' या परिस्थितीत कंपनीने औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना पर्यायी इंधनाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. ओएनजीसीचा प्लांट पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतरच गॅसचा पूर्ण पुरवठा पूर्ववत होण्याची अपेक्षा एम.जी.एल.ने व्यक्त केली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com