
निलेश वाघ
आधी अवकाळी आणि आता मान्सूनच्या तडाख्याने नाशिकच्या लासलगावसह कांदा उत्पादक पट्ट्याला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे वार्षिक आर्थिक गणित कोमलडले आहे. त्यामुळे पुढच्या काळात जगावे कसे ? असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतात व चाळीत साठवून ठेवलेला कांदा भिजला. तर अनेक ठिकाणी काढणीला आलेला कांदा काढता न आल्याने त्याचे ही नुकसान झाल्याचे चित्र आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाल्याने चांगला भाव मिळेल हे त्यांचे स्वप्न भंगलं आहे. त्यापैकी नाशिकच्या येवला तालुक्यातील निळखेडे गावातील अर्जुन कदम त्यांनी जवळपास तीन एकरात उन्हाळ कांद्याचे उत्पादन घेतले होते. त्यासाठी त्यांनी उधार उसनवार करून महागाचे कांद्याचे बियाणे खरेदी केले. नांगरणी, उखरणी ,लागवड, निंदणी, खुरपणी त्याचप्रमाणे महागडे खते, फवारणी असा सुमारे एकरी 70 हजार रुपयांप्रमाणे खर्च केला. त्यांना तीन एकराला जवळपास दोन लाख दहा हजार रुपये खर्च आला. कांद्याचे उत्पादन जोमात आले. त्यातून बऱ्यापैकी पैसे मिळतील अशी अपेक्षा कांदा उत्पादक अर्जुन कदम यांना होती.
दोन ते तीन दिवसात कदम कांदा काढणीला सुरवात करणार होते. मात्र अचानक आलेल्या अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते करून टाकले. गेल्या 4 मे पासून अवकाळी पावसाला सुरवात झाली. तेव्हापासून सतत पाऊस सुरू आहे. पावसाने कांदा काढायला उसंत न दिल्याने कांद्याच्या शेतात अक्षरश: तळे साचले आहे. हे कांदे शेतात सडून त्याला उग्र वास येऊ लागला आहे. त्यामुळे कदम यांचे शंभर टक्के नुकसान झाल्याने त्यांचे सपूर्ण आर्थिक गणित कोलमडल्याने ते हतबल झाले आहे. अर्जुन कदम यांच्या प्रमाणे त्यांच्या कुटुंबीयांचे स्वप्ने देखील पावसाने धुवून टाकले. आता पोरा-बाळांचे शिक्षण कसे करायचे, मुला मुलींचे लग्न कसे करायचे ? घरातील वृद्धांचे आजारपणाचा खर्च कसा करायचा यासह अनेक प्रश्न या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सतावत आहे.
निसर्गाच्या अवकृपने कांदानगरी अशी ओळख असलेल्या लासलगावसह नाशिकच्या कांदा उत्पादक पट्ट्याला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडताना दिसत आहे. आता शासकीय पातळीवर नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहे. किती मदत मिळेल याबाबत साशंकता आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पुढच्या काळात उभे करण्यासाठी आता शासनाने भरीव मदत देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे मायबाप सरकार या शेतकऱ्यांना किती मदत करणार याकडेच शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world