
मनोज सातवी, पालघर: गेल्या काही दिवसांपासून राज्याची आरोग्य यंत्रणाच सलाईनवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुण्यामधील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. दुसरीकडे आदिवासी भागात उपचाराअभावी नागरिकांचा बळी जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशातच आता पालघरच्या जव्हार - मोखाड्यातील रुग्णालयांमधील सुविधां अभावी नवजात बालकाचा नाशिकमध्ये मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पालघरच्या जव्हार - मोखाड्यातील रुग्णालयांमधील सुविधांअभावी नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या नवजात बालकाचा जीव वाचवण्यासाठी कुटुंबाने शंभर किलोमीटरची धावपळ केली मात्र त्यांचे हे प्रयत्न अपयशी ठरले. या धक्कादायक प्रकारामुळे पालघरमधील आरोग्य यंत्रणा अपयशी असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.
पालघरच्या मोखाडा येथील योगिता पुजारी या महिलेने जन्म दिलेल्या बाळाला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने बाळाच्या उपचारासाठी आधी मोखाडा येथून जव्हार आणि नंतर जव्हार मधून थेट नाशिक गाठले,, मात्र नाशिक रुग्णालयात दाखल करताच काहीच वेळात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे पालघरमधील आरोग्य यंत्रणा खीळखळी असल्याच पुन्हा एकदा उघड झाले. पालघर जिल्ह्यात विकासाचे नवनवीन प्रकल्प सुरू असताना चौथी मुंबई वसवणार असताना, पालघर मधील जव्हार - मोखाड्यातील आरोग्य प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात एका प्रसुती झालेल्या महिलेला तिच्या नवजात बाळासह चक्क बाकड्यावर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. रुग्णालय प्रशासनाकडून या महिला रुग्णाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. विशेष म्हणजे या महिला रुग्णासोबत तिचे नातेवाईक देखील नव्हते. एखाद्या प्रसूती झालेल्या महिला रुग्णाला अशा प्रकारे उघड्यावर ठेवल्याने रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला असून याबाबत संताप व्यक्त केला जात होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world