संकेत कुलकर्णी, पंढरपूर
शक्तीपीठ महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, पंढरपूर आणि सांगोला तालुक्यातूनच जावा. यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. लवकरच या तिन्ही तालुक्यातील शेतकरी आणि सर्वपक्षीय आजी-माजी आमदार मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मूळ आरेखाना प्रमाणे शक्तीपीठ झाला पाहिजे. अशी भूमिका मांडणार आहेत. जर मूळ आरेखाना प्रमाणे शक्तिपीठ झाला नाही तर शक्तिपीठाच्या समर्थनार्थ जनआंदोलन उभा करण्याची तयारी पंढरपुरात झाली आहे.
पंढरपूर येथे मोहोळ सांगोला आणि पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा शक्तिपीठाच्या समर्थनार्थ मेळावा झाला. या मेळाव्यासाठी मोहोळचे शरद पवार पक्षाचे आमदार राजू खरे ,शेकापचे सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख , पंढरपुरातील भाजप नेते प्रशांत परिचारक यांच्यासह तिन्ही तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
शक्तीपीठाच्या मूळ आरेखानानुसार हा महामार्ग उत्तर सोलापूर तालुका , मोहोळ , पंढरपूर आणि सांगोला अशा चार तालुक्यातून जाणार होता. मात्र नुकत्याच झालेल्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यातून आरेखन बदलले असल्याची माहिती दिली. त्यामुळे नव्याने हा मार्ग बार्शी तालुक्यातील वैराग मार्गे पुढे माढा आणि माळशिरस तालुक्यात जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून मोजणी आणि मूल्यांकन झालेल्या सांगोला, पंढरपूर आणि मोहोळ मधील शेतकरी आता शक्तिपीठाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेला दिसतोय.
शक्तिपीठाच्या महामार्गासाठी सुरुवातीला कोल्हापूर येथून विरोधाचे आंदोलन उभारले. त्यामुळे कोल्हापुरातून मार्ग बदलण्यात आला. आता सोलापूर जिल्ह्यातील मार्ग बदलला म्हणून शेतकरी शक्तीपीठाच्या समर्थनासाठी आंदोलन करत आहेत. परिणामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शक्तिपीठ महामार्ग वेगवेगळ्या पद्धतीने कायमच चर्चेत राहताना दिसतोय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world