
पंढरपूर: विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या पुढील चार महिन्यांच्या सर्व राजोपचारातील पूजा बुकिंग हाउसफुल झाले आहे. या पूजा बुकिंगमधून अवघ्या सात तासात विठ्ठलाच्या तिजोरीत 75 लाख रुपयांची पूजा देणगी जमा झाली असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
विठ्ठलाच्या पूजेचे ऑनलाइन पद्धतीने मंदिरे समितीच्या संकेतस्थळावर आज सकाळी 11 वाजता बुकिंग सुरू झाले. अवघ्या सात तासातच सर्व पूजा फुल होऊन विठ्ठलाच्या तिजोरीत 75 लाख रुपये पूजा देणगी जमा झाली आहे. यामध्ये विठ्ठलाच्या नित्य पूजा आणि चंदनउटी पूजाचा समावेश आहे. नित्य पूजा , पाद्य पूजा , तुळशी पूजा आणि चंदन उटी पूजा अशा चारपूजांचे बुकिंग आज सुरू झाले. यामधील बहुतांश पूजा पूर्ण क्षमतेने बुक झाल्या.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विठ्ठलाची पहाटे साडेचार वाजता नित्य पूजा होते. या पूजेसाठी एका कुटुंबातील पाच भाविक उपस्थित राहू शकतात. तर रात्री साडेदहा वाजता पाद्य पूजा होत असते. सकाळी दहा वाजता आणि दुपारी चार वाजता तुळशी पूजा होते. तर येत्या गुढीपाडव्यापासून उन्हाळ्यामुळे पुढील तीन महिने दुपारी चार वाजता चंदन उटी पूजा देखील होणार आहे. याच पूजांचे बुकिंग आज सुरू करण्यात आले. यामध्ये पहाटेची नित्य पूजा आणि चंदन उटी पूजा अवघ्या काही तासातच हाउसफुल झाल्या.
विठ्ठलाच्या पूजेसाठी पूर्वी एक वर्ष भाविकांना प्रतीक्षा करावी लागत होती. त्यामुळे मंदिरे समितीने तीन महिन्यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने पूजांचे बुकिंग सुरू केले. प्रत्येकी तीन महिन्यांच्या पूजांचे बुकिंग ऑनलाइन पद्धतीने होत असते. यामध्ये पुढील चार महिन्यांसाठी सुरू केलेल्या बुकिंग च्या टप्प्यात अवघ्या काही तासातच भाविकांनी उदंड प्रतिसाद दिलेला दिसून आला. त्यामुळे आता वारकरी भक्तांना नव्या पूजा बुकिंग साठी पुढील चार महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
विठ्ठलाच्या ऑनलाइन पूजा बुकिंग साठी काही ई सेवा केंद्र तसेच खाजगी व्यक्तींच्या माध्यमातून भाविकांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत भाविक पुढे आल्यास संबंधितांवर थेट कायदेशीर कारवाई मंदिर समितीच्या माध्यमातून होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world