योगेश लाटकर, प्रतिनिधी
Pankaja Munde to Quit Parli : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी परळी मतदारसंघाबाबत केलेल्या एका खळबळजनक विधानानंतर आता राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. पंकजा मुंडे आता बीड सोडून नांदेडमधील लोहा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नांदेडमधील माळाकोळी येथे गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी बोलताना पंकजा मुंडे यांनी मी परळी धनुभाऊला देऊन टाकली आहे, आता मला माळाकोळीवर प्रेम करू द्या, असे विधान केले. या एका विधानामुळे पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनाची नवी जागा लोहा असू शकते, अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत.
पंकजांनी दावा सोडण्याचं कारण काय?
गोपीनाथ मुंडे यांचा वारसा म्हणून पंकजा मुंडे यांनी परळीचे अनेक वर्षे नेतृत्व केले. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि हा मतदारसंघ धनंजय मुंडे यांच्या ताब्यात गेला. त्यानंतर झालेल्या नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही धनंजय मुंडे यांनी परळीवर आपली पकड मजबूत केली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही पंकजा मुंडे यांना परळीतून अपेक्षित लीड मिळाले नव्हते. या सर्व पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी परळीचा नाद सोडून आता नव्या मतदारसंघाची चाचपणी सुरू केल्याचे चित्र दिसत आहे.
( नक्की वाचा : Latur News : 'विलासरावांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील,' भाजपा प्रदेशाध्यक्षांचं काँग्रेसला थेट चॅलेंज )
लोहा मतदारसंघाची राजकीय गणिते
नांदेड जिल्ह्यातील लोहा विधानसभा मतदारसंघ हा पंकजा मुंडे यांच्यासाठी सुरक्षित ठरू शकतो का, यावर आता खल सुरू झाला आहे. माळाकोळी हा भाग याच मतदारसंघात येतो. लोह्याचे सध्याचे राजकीय समीकरण पाहिले तर हा मतदारसंघ मराठा बहुल आहे. येथे साधारणपणे 60 टक्के मराठा, 25 टक्के ओबीसी आणि 12 टक्के मुस्लिम मतदार आहेत.
पंकजा मुंडे या स्वतः ओबीसी चेहरा असल्या तरी लोह्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र, मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर बदलेली परिस्थिती पाहता, मराठा बहुल लोहा मतदारसंघातून निवडणूक लढवणे ही पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठी राजकीय रिस्क मानली जात आहे.
भावासाठी केलेला त्याग की नवी रणनीती?
परळीत साडी खरेदी करताना बहीण-भावामधील प्रेम संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. धनंजय मुंडे यांनी पंकजा यांच्यासाठी साडी खरेदी केली आणि बिलही स्वतः भरले. याचवेळी पंकजा यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या त्यागाच्या भावनेचा उल्लेख करत मी धनुभाऊच्या जखमेवर मलम लावले, असे म्हटले.
पंकजा मुंडे यांनी परळी मतदारसंघ धनंजय मुंडे यांच्यासाठी मोकळा करून दिल्याचे संकेत दिल्याने, आता धनंजय मुंडे यांना घरूनच मोठे पाठबळ मिळाले आहे. मात्र, पंकजा मुंडे जर परळी सोडणार असतील, तर त्यांच्या समर्थकांचे काय, हा प्रश्न कायम आहे.
( नक्की वाचा : Video : 'शिवाजी महाराज की जय' म्हणणाऱ्यांवर गार्डने काठी उगारली? देवगिरी किल्ल्यावरील व्हायरल व्हिडिओनं संताप )
प्रतापराव चिखलीकरांची भूमिका काय?
लोहा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रतापराव चिखलीकर यांनी पंकजा मुंडे यांच्या संभाव्य उमेदवारीचे स्वागत केले आहे. पंकजा मुंडे जर येथून लढणार असतील तर मी त्यांचे स्वागतच करेन, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
चिखलीकर यांनी आजवर तीन वेगवेगळ्या पक्षांतून येथून विजय मिळवला आहे, त्यामुळे त्यांची साथ पंकजा यांना मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. पंकजा मुंडे खरोखरच लोहा मतदारसंघ निवडतात की हे केवळ भावनिक विधान होते, याचे उत्तर आगामी काळातच मिळेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world