सुरज कसबे, पिंपरी चिंचवड:
Pimpri Chinchwad Election 2026: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले असून शहरात राजकीय रणधुमाळीला वेग आला आहे. एकूण ३२ प्रभागांमधील १२८ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत तब्बल ६९२ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. अर्ज माघारीच्या मुदतीनंतर आता प्रमुख राजकीय पक्षांनी कंबर कसली असून प्रभागांमध्ये प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये ६९२ उमेदवार
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत सर्वाधिक ताकद लावली आहे. पक्षाने १२५ उमेदवार अधिकृतपणे उभे केले असून ३ उमेदवारांना पुरस्कृत केले आहे. निवडणुकीपूर्वीच भाजपने आपले खाते उघडले असून पक्षाचे २ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. विशेष म्हणजे, महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या आरपीआय (आठवले गट) चे ५ उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर ही पहिलीच महापालिका निवडणूक असल्याने दोन्ही गटांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. अजित पवार गटाने ११८ उमेदवारांसह मोठी फळी उभी केली आहे, तर शरद पवार गटाने केवळ ११ जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. शिवसेनेच्या बाबतीतही अशीच स्थिती असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ५७ उमेदवार आणि ३ पुरस्कृत उमेदवारांसह मैदानात आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ५० उमेदवार उतरवले आहेत.
तिरंगी आणि चौरंगी लढतींची शक्यता:
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) १४ उमेदवार दिले असून काँग्रेसने ४९ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. प्रमुख पक्षांसोबतच विविध स्थानिक आघाड्या आणि अपक्ष उमेदवारांच्या मोठ्या संख्येमुळे अनेक प्रभागांत तिरंगी किंवा चौरंगी चुरस पाहायला मिळणार आहे. बंडखोरी थोपवण्यात काही पक्षांना यश आले असले तरी, १६६ अपक्ष उमेदवारांची भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरेल का हे पाहणे देखील महत्वाचे असणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world