Pratap Sarnaik on Omraje Nimbalkar: ईव्हीएम मशिनमध्ये गडबड असल्याचा दावा विरोधक सातत्याने करत असतात. निवडणुकीतील पराभवाचं खापर सर्रासपणे विरोधक ईव्हीएमवर फोडतात. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्याच पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ईव्हीएमची पाठराखण केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या या भूमिकेचे धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर कौतुक केले असून, यावरून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
ओमराजे निंबाळकर नेमके काय म्हणाले?
ढोकी येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ओमराजे निंबाळकर यांनी ईव्हीएममधील घोटाळ्याचे दावे फेटाळून लावले. ते म्हणाले, "जर ईव्हीएममध्ये खरोखर घोळ असता तर मी खासदार झालो असतो का? मोदी साहेबांसाठी लोकसभेची निवडणूक महत्त्वाची होती. मग तिथे घोळ करून मला पाडले नसते का? मी खासदार झालो याचाच अर्थ ईव्हीएममध्ये घोटाळा नाही."
(नक्की वाचा- Ajit Pawar VIDEO: बायोपिक आला तर हिरो कोण? खुद्द अजितदादांनीच सुचवलं होतं 'या' अभिनेत्याचं नाव!)
"ईव्हीएममध्ये घोळ नाही, मात्र जागरूक राहणे गरजेचे आहे. मतदानाच्या दिवशी 50 मते तपासणे, 7C फॉर्मवरील सिरीयल नंबर नोंदवणे आणि मतमोजणीवेळी तीच मशीन आहे का? याची खात्री करणे. या तीन गोष्टी केल्या, तर ईव्हीएममध्ये घोळ शक्य नाही, असा ठाम विश्वास ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केला.
प्रताप सरनाईकांचा ठाकरेंवर पलटवार
ओमराजेंच्या या वक्तव्याचा धागा पकडून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला घेरले. "ओमराजेंनी सत्य स्वीकारले आहे. आता दररोज सकाळी भोंगा वाजवणाऱ्या संजय राऊतांना सांगा की ईव्हीएममध्ये घोटाळा नाही. तुम्ही स्वतःच्या खासदाराचे तरी ऐका. निवडून आले की ईव्हीएम चांगले आणि पराभव झाला की ईव्हीएममध्ये घोटाळा, अशी दुटप्पी भूमिका आम्ही कधीच घेतली नाही. भाजप आणि शिवसेनेने (शिंदे गट) काहीतरी लफडे केले असा दोष देणे आता थांबवा, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- Holiday News: 7 फेब्रुवारीला राज्यात सुट्टी जाहीर, कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)
'ऑपरेशन टायगर' सुरू होणार!
प्रताप सरनाईक यांनी यावेळी बोलताना, केवळ ईव्हीएमवरच भाष्य केले नाही, तर राजकीय भविष्याचेही संकेत दिले. "जिल्हा परिषद निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा 'ऑपरेशन टायगर' सुरू होणार आहे," अशी मोठी माहिती त्यांनी दिली. यामुळे निवडणुकीनंतर पुन्हा एकदा मोठ्या राजकीय उलथापालथी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.