रायगड किल्ला विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यामध्ये असलेल्या प्रतापगडाच्या विकासासाठी हे प्राधिकरण स्थापन करण्यात आले असून या प्राधिकरणाची रचना आणि सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे.
प्रतापगड किल्लाचे बांधकाम 1656 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशावरून मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली करण्यात आले होते. 10 नोव्हेंबर 1659 रोजी याच प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही सरदार अफजलखानाचा खात्मा केला होता. अशा या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या किल्ल्याच्या विकासासाठी प्राधिकरण तयार करण्यात आले आहे.
प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद खासदार उदयनराजे भोसले यांना देण्यात आले आहे. पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने या प्राधिकरणासंदर्भात शासन आदेश जारी केला असून यामध्ये प्राधिकरणातील सदस्यांची माहिती देण्यात आली आहे. या प्राधिकरणामध्ये पुण्याचे विभागीय आयुक्त साताऱ्याचे जिल्हाधिकारी,पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे प्रादेशिक संचालक, पुणे, पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक यांचा समावेश असेल. या व्यतिरिक्त विशेष निमंत्रितांमध्ये
- नितीन शिंदे
- मिलिंद एकबोटे
- शरद पोंक्षे
- सदाशिव टेटविलकर
- सोमनाथ धुमाळ
- चंद्रकांत पाटील
- पंकज चव्हाण
- अमोल जाधव
यांचा समावेश करण्यात आला आहे. प्राधिकरणाची बैठक दर महिन्याला आयोजित करण्यात येणार आहे. दर महिन्याला बैठक शक्य नसल्यास चक्रीय पद्धतीने मान्यता घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. प्राधिकरणाला आवश्यकता असल्यास संबंधित अधिकारी किंवा तज्ज्ञ यांना बैठकीसाठी निमंत्रित करता येईल असे शासन आदेशात म्हटले आहे.
सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक व निसर्ग पर्यटन स्थळांच्या विकासासाठी, एकात्मिक पर्यटन विकास आराखडा अंतर्गत रु.381.56 कोटी रकमेची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये प्रतापगड किल्ला जतन व संवर्धनासाठी रु.127.15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी आता प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात येणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world