
रेवती हिंगवे, पुणे: मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पावसाने अतोनात नुकसान केले आहे. लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या महाप्रलयाने अनेक संसार उध्वस्त झाले आहेत. मराठवाड्यातील अडचणीत असलेल्या या जनतेला सर्वांकडून मदतीचे आवाहन केले जात आहे. एकीकडे राज्य सरकारकडून मोठ्या मदतीची अपेक्षा होत असतानाच पुण्यातील शनिपार चौकातील पदपथावर भाजी विक्री करणाऱ्या चरण नामदेव वनवे यांनी राज्यातील पूरग्रस्तांसाठी लाखो रुपयांची मदत करून एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिलं आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्याच्या शनिपार चौकात पदपथावर भाजी विकणारे चरण नामदेव वनवे यांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक लाख 13 हजार 740 रुपयांचा धनादेश सुपूर्त केला. कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्यासमवेत हा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आला. वनवे यांनी आपल्या घरातील महाराजांच्या पादुकांसमोर ठेवलेल्या डब्यात दररोज भाजी विक्रीतून शंभर रुपये बाजूला ठेवण्याची परंपरा जोपासली आहे. हीच रक्कम आज पूरग्रस्तांसाठी मदतीच्या रूपाने त्यांनी दिली.
वनवे म्हणाले की, "आपल्याकडील पैसा इतरांच्या कामाला आला तरच त्याला खरी किंमत आहे. माझ्या आईने कोरोनाच्या काळात गरजूंना एक लाख रुपयांची मदत केली होती. तिची शिकवण पुढे नेत मीही समाजासाठी ही बचत करत आलो आहे." पूरग्रस्तांना मदतीचा हात देणाऱ्या भाजीविक्रेत्याच्या या योगदानामुळे, छोट्या छोट्या बचतीतूनही मोठं समाजकारण घडू शकतं, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world