
रेवती हिंगवे, पुणे: विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीसह काँग्रेसला लागलेली गळती काही थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर काँग्रेसला पुण्यामध्ये आणखी एक सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता असून काँग्रेसचे निष्ठावंत नेते माजी आमदार संग्राम थोपटे हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते, भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत आता सर्वात मोठी अपडेट समोर आली असून संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता आहे.
या पक्षप्रवेशाआधी संग्राम थोपटे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करुन ते पुढील निर्णय घेणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे संग्राम थोपटे यांच्या रुपाने काँग्रेसला पुण्यात सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा- "मी राज ठाकरेंना भेटेन आणि विनंती करेन", हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर बावनकुळे काय म्हणाले?)
संग्राम थोपटे हे पुण्यामधील भोर विधानसभेचे माजी आमदार आहेत. थोपटे कुटुंबीय हे भोर तालुक्यातील मातब्बर राजकीय घराणे तसेच काँग्रेसचे निष्ठावंत राजकारणी म्हणून प्रसिद्ध आहे. संग्राम थोपटे हे भोरमधून तीन वेळा आमदार म्हणून निवडूण आलेत तर त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे भोरचे सहा वेळा आमदार होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत संग्राम थोपटे यांना पराभवाचा धक्का बसला ज्यानंतर ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशावरील चर्चांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. मध्यंतरी काँग्रेसने त्यांना विधानसभा अध्यक्ष करण्याचा ठरवलं होतं पण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना त्या पदापर्यंत जाऊ दिलं नाही. त्यांच्या परिवारातला संघर्षाचा वारसा त्यांनी जोपासला पाहिजे असे अपेक्षा आहे, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणालेत.
तसेच संग्राम थोपटे त्याकाळी विधानसभेचे अध्यक्ष झाले असते तर आज हे झाले नसते. हे सगळे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे झाला आहे...थोपटे यांच्यावर अन्याय देवेंद्र फडणवीस यांनी केला...देवेंद्र फडणवीस यांच्या कुठल्याही झाश्यामध्ये त्यांनी येऊ नये. त्यांनी आत्मघातकी आणि चुकीचा संदेश जाईल असा निर्णय घेऊ नये, असे आवाहनही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केले.
(नक्की वाचा- नाशिकमधील हिंसाचार सुनियोजित, दंगेखोरांवर कडक कारवाई करणार : CM देवेंद्र फडणवीस)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world