रेवती हिंगवे, पुणे: पुणे शहरात मद्यधुंद चालकाने बेदरकारपणे डंपर चालवत फुटपाथवर झोपलेल्या 9 मजूरांना चिरडल्याची घटना घडली. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी आहेत. दिवसभर हमाली करुन गाढ झोपलेल्या मजुरांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. नेमका का अपघात कसा झाला? याबाबतचा थरार प्रत्यक्षदर्शींनी सांगितला आहे.
पुण्यातील वाघोली चौक, वाघोली पोलीस स्टेशन समोर एका डंपर चालकाने फूथपाथवर डंपर चालवून 9 जणांना चिरडले त्यात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. मद्यधुंद डंपर चालकाने दारू पिलेल्या अवस्थेत फुटपाथवर झोपलेल्या लोकांवर डंपर चढवला. अपघातामध्ये एकूण तीन जण जागीच मृत पावले असून इतर सहा जण जखमी आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विशाल विनोद पवार (वय 22 वर्ष, रा. अमरावती जिल्हा), वैभवी रितेश पवार (वय 1 वर्ष) ( वैभव रितेश पवार वय 2 वर्ष) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर जानकी दिनेश पवार (वय 21 वर्षे), रिनिशा विनोद पवार (वय,18 ) रोशन शशादू भोसले ( 9 वर्षे), नगेश निवृत्ती पवार (वय 27 वर्षे) दर्शन संजय वैराट (वय 18) आलिशा विनोद पवार (वय 47) अशी जखमींची नावे आहेत.
कसा झाला अपघात?
प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील हे मजुर पोट भरण्यासाठी पुण्याच्या वाघोली परिसरात राहत होते. दिवसभर हमालीचे काम करुन आल्याने सर्वांना गाढ झोप लागली. याचदरम्यान एक भरधाव डंपर फुटपाथवर आला अन् झोपेत असलेल्या मजुरांना चिरडले. हे भयंकर दृश्य पाहून अपघातस्थळी एकच गोंधळ उडाला. मृतांच्या वडिलांनी सांगितले की, धावत जाऊन माझ्या मुलाला पाहिले तर त्याचा जागीच जीव गेला होता, मुलीच्याही तोंडातून रक्त वाहत होते, तिचाही मृत्यू झाला आणि त्यांचा काकाही ठार झाला.
दरम्यान, या अपघातातील आरोपी डंपर चालक गजानन शंकर तोट्रे( 26 वर्षे रा. नांदेड) याला ताब्यात घेतले असून मेडिकल चाचणीसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवले आहे. आरोपीविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला असून वैद्यकीय चाचणी करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वपोनी पंडित रेजितवाड करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world