किल्ले रायगड येथे 5 आणि 6 जून रोजी साजरा होणाऱ्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी लाखो शिवभक्त गडावर दाखल होत आहेत. गडाच्या दुरुस्ती आणि संवर्धनासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असतानाच, गडावर अत्यंत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. विशेषतः महिला शिवप्रेमींसाठी बांधण्यात आलेली स्वच्छतागृहे बंद असल्याने गडावर येणाऱ्या महिलांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
स्वच्छतागृहे बंद; महिलेची व्हिडिओ क्लिप व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार, रायगड किल्ल्यावर महिलांसाठी एकूण 5 स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. मात्र, पाण्याअभावी आणि काही तांत्रिक कामे अपूर्ण राहिल्यामुळे ही सर्व स्वच्छतागृहे सध्या कुलूपबंद आहेत. नुकतीच पुण्यातील काही महिला शिवप्रेमी गडावर दर्शनासाठी आली होती. स्वच्छतागृहे बंद असल्याने त्यांना झालेल्या त्रासाचा आणि संतापाचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे.
रायगडावर जाण्यासाठी 25 रुपयांचा तिकीट आकारलं जातं. मात्र हे पैसे कशासाठी घेता, असा सवाल देखील महिलेने उपस्थित केला. तसेच गडावर जर स्वच्छतागृहांची सोय नसेल तर गडाचं पावित्र्य राखलं जाईल का? अशी विचारणाही महिलेने केली.
पाहा VIDEO
(नक्की वाचा- Hero MotoCorp New Bike: हिरो मोटोकॉर्पचा मोठा धमाका! पेट्रोल किंवा चार्जिंगशिवाय धावणार बाईक)
कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही अडचण
महिलेनी गडावरील स्थानिक कर्मचाऱ्यांकडे आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे याबाबत जाब विचारला असता, त्यांनी नेहमीप्रमाणे स्वतःची जबाबदारी झटकत केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे (ASI) बोट दाखवले. कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही एवढी साधी अडचण सोडवली जात नसल्याने शिवप्रेमींमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार अॅक्शन मोडमध्ये
ऐन सोहळ्याच्या तोंडावर गडावरील या अव्यवस्थेची बातमी आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्य सरकार तातडीने जागे झाले आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मंगळवारी मुंबईत एक तातडीची बैठक घेऊन या परिस्थितीचा सर्वकष आढावा घेतला.
(नक्की वाचा- Cyber Crime News: राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला लग्नपत्रिका पाठवली, अन्...; सायबर चोरांचा मोठा डाव)
रायगड किल्ला परिसरातील विकासकामे, जनसुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि संवर्धन कामांची तपासणी करण्यासाठी रायगड विकास प्राधिकरणासह संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी तातडीने किल्ल्यावर जाऊन 'संयुक्त पाहणी' करावी, असे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले आहेत. सोहळ्यापूर्वी सर्व व्यवस्था सुरळीत करण्याचे आव्हान आता प्रशासनासमोर आहे.