वसई-विरार परिसरात सायबर गुन्हेगारांचे जाळे दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे. आतापर्यंत सर्वसामान्यांना लुटणारे हे सायबर चोर आता थेट राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील बड्या व्यक्तींना लक्ष्य करू लागले आहेत. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी अनिल गुरव यांचा मोबाईल हॅक झाल्याची एक अत्यंत धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. लग्नसराईचा गैरफायदा घेऊन सायबर चोरांनी हा नवा सापळा रचला आहे.
अश्विनी गुरव यांच्यासोबत काय घडले?
अश्विनी अनिल गुरव या आपल्या व्हॉट्सॲपवरील नेहमीचे मेसेज पाहत असताना अचानक त्यांचे व्हॉट्सॲप खाते लॉगआऊट झाले. काहीतरी गडबड झाल्याचे त्यांच्या लक्षात येईपर्यंत सायबर चोरांनी त्यांच्या मोबाईलमधील डेटा चोरून त्यांच्याच नंबरवरून तब्बल 3,000 ते 3,500 संपर्कांना लग्नपत्रिकेचे संशयास्पद मेसेज पाठवून दिले.
(नक्की वाचा- Jeans Small Pocket: जीन्सला उजव्या बाजूला 'तो' छोटा खिसा का असतो? जाणून घ्या रंजक माहिती)
अश्विनी गुरव या केवळ राजकीय नेत्या नसून एका शाळेच्या मुख्याध्यापिका देखील आहेत. त्यामुळे त्यांच्या मोबाईल संपर्क यादीत तहसीलदार, पोलीस अधिकारी, शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी, शिक्षक आणि समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश आहे. या सर्वांना हे हॅकिंगचे मेसेज गेल्यामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
या गंभीर प्रकारानंतर अश्विनी गुरव यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला असून माणिकपूर पोलीस ठाणे आणि सायबर गुन्हे शाखेत या संदर्भात रीतसर तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलिसांना नागरिकांना आवाहन केले की, व्हॉट्सॲप किंवा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलेल्या अज्ञात फाईल्स, विशेषतः ज्यांच्या शेवटी '.APK' लिहिलेले असते, त्या कधीही डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नका. यामुळे तुमच्या बँक खात्याची माहिती आणि वैयक्तिक डेटा चोरीला जाऊ शकतो."
(नक्की वाचा- Hero MotoCorp New Bike: हिरो मोटोकॉर्पचा मोठा धमाका! पेट्रोल किंवा चार्जिंगशिवाय धावणार बाईक)
नेमका काय आहे हा 'वेडिंग कार्ड' सायबर स्कॅम?
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या लग्नघाईचे दिवस असल्याने सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीची एक नवी युक्ती शोधून काढली आहे. हे चोरटे नागरिकांच्या व्हॉट्सॲपवर "Invitation Card.apk" किंवा अशाच नावाची एक फाईल पाठवतात. त्यासोबत “आमच्या घरी लग्न आहे, पत्रिका पाहा” असा भावनिक किंवा आपुलकीचा संदेश लिहिला असतो. अनेक नागरिक ही खरोखरच कोणा परिचिताच्या घरची लग्नपत्रिका आहे असे समजून ती फाईल डाउनलोड करतात. मात्र, ही कोणतीही इमेज किंवा पीडीएफ फाईल नसून एक घातक 'मालवेअर' असलेली APK फाईल असते. ही फाईल मोबाईलमध्ये इन्स्टॉल होताच चोरांना तुमच्या फोनचा पूर्ण ताबा मिळतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world