बोरिवली: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बोरिवली विधानसभेचे उमेदवार कुणाल माईणकर यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी विविध प्रश्नांवरुन महायुतीसह महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. मुंबईमधील गर्दी, बाहेरुन येणारे लोंढे यामुळे इथल्या स्थानिकांना अडचणी निर्माण झाल्या, असं ते म्हणाले. नेत्यांना मतदारांची भिती राहिली नाही, कारण तुम्ही प्रश्न विचारत नाही, असे म्हणत यावेळी त्यांनी राज्यकर्त्यांना खडेबोल सुनावले.
काय म्हणाले राज ठाकरे?
२० वर्षांपूर्वी सांगितलेल्या गोष्टी आजही जाहीरनाम्यात होत्या. काँग्रेसचं तर बोलूच नका. मला एक गोष्ट सांगा. गेली. ३०- ४० वर्ष बोरिवलीत राहणारे किती जण आहेत?तुमच्या मनाला काय वाटत? जुने बोरिवली चांगलं होतं की नवं? मग आपण डेव्हलपमेंट कशाला म्हणतो? याचे कारण म्हणजे कसलीही यंत्रणा लावली नाही. नुसती बदाबदा माणसं पडत आहेत. याचा त्रास मूळ करदात्यांना व्हायला लागला. तुम्हाला वेळ मिळाला तर माझ्या घरी या माझ्याकडे दोन फोटो लावलेत शिवाजी पार्कचे. १९८५ मधील तो फोटो आहे. तो फोटो पाहून समजेल शहर बसवतात म्हणजे काय करतात. याच बोरिवलीत संजय गांधी नॅशनल पार्क आहे.फक्त भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये इतकं मोठ पार्क फक्त मुंबईमध्ये आहे. न्यूयॉर्कमध्ये सेंट्रल पार्क नावाचे एक मैदान आहे, ते इतकं मोठं आहे की त्यात २० शिवाजी पार्क मैदान बसतील. अशी २० पार्क बसतील, एवढं आमचं संजय गांधी नॅशनल पार्क आहे. पोवईला सुरु होतं. आम्ही बोंबलतोय आमच्या घरात बिबट्या आला. तुम्ही बिबट्याच्या घरात गेलात. अशा गोष्टी दुसऱ्या जगात मिळाल्या तर त्यांनी कसं जपलं असतं? याची आपण कल्पना करु शकत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
'डोंबिवलीकरांना आवाहन..'
'आमचीच शहर बॉम्ब टाकल्यासारखी का वाटतात. रटाळ, घाणेरडी, तुटलेले फुटपाथ. बोजवारा उडालेली सगळी शहरं. याचे कारण म्हणजे आपल्याला काय पाहिजे याची कल्पना तुम्हालाही नाही आणि काय चांगलं दिलं पाहिजे याची कल्पना राज्यकर्त्यांनाही नाही.तुमची भिती उरलेली नाही. तुम्ही नागरिक आहात, मतदार आहात, तुमच्या मतांवर हे अवलंबून असतात. नंतर पाच वर्ष बघतही नाहीत. त्यामुळे आता मत मागायला येणाऱ्यांना प्रश्न विचारा. पंतप्रधान मोदी, बाळासाहेब ठाकरे, इंदिर गांधी यांच्या नावावर जे मत मागायला येतात, त्यांना मतदान करुन मोकळे होता. बोरिवलीचे प्रश्न मोदींना कसे सांगायचे?या राजकारण्यांना कळलेलं आहे, निवडणूक आली की पैसे फेकून मारा हे खुश. सुज्ञ मतदार काय असतो याचे उदाहरण मी पुण्यात दिले. आपल्यासाठी काम करणारा माणूस कोण आहे ते ओळखा,' असे आवाहन त्यांनी डोंबिवलीकरांना केले.
"लोकांनी मतदान करायचे अन् राजकीय पक्षांनी घोळ घालायचा. 70,000 कोटींच्या घोटाळ्यात ज्यांना अटक करायला पाहिजे होती, त्यांच्यासोबत शपथविधी करताना एक माणूस दिसला. अर्ध्या तासात ते लग्न तुटलं. यांच्यासाठी तुम्ही मतदानाच्या रांगेत उभे राहता का? यांच्या ढांगे घालून ४० आमदार फुटतात. आजपर्यंत विरोधकांचे आमदार फुटतात पण 40 आमदार फुटलेला असा हा जगातला पहिला सत्ताधारी पक्ष असेल. २०२४ची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. एकदा राज ठाकरेंच्या हातात सत्ता द्या, असं आवाहनही राज ठाकरेंनी यावेळी केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world