नवी मुंबई / सुरेश दास : एप्रिल-मे महिन्यात ऊन वाढायला लागतं तसं घराघरांमध्ये मसाला करण्याची तयारी सुरू होते. वर्षभरासाठी साठवणुकीचा मसाला तयार करून ठेवला जातो. यासाठी अगदी पाच किलो आणि त्यापुढेही आवश्यकतेनुसार मिरच्यांची खरेदी केली जाते. गेल्या काही महिन्यांपासून मिरचीच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी दिवाळीपासूनच लाल मिरचीचा ठसका वाढला होता. मसाल्यासाठी वापरले जाणारे लाल मिरच्यांचे दर घाऊक बाजारातच 400 ते 700 रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. मात्र सध्या हेच दर 150 ते 350 रुपयांपर्यंत घसरले आहेत.
ऊन वाढायला सुरुवात झाली की अनेकजण मसाला करण्याच्या तयारीला लागतात. यावर्षी अगदी दिवाळीपासूनच लाल मिरचीचा ठसका वाढला होता. सुक्या मसाल्याच्या लाल मिरच्यांचे दर घाऊक बाजारातच 400 ते 700 रुपये किलो झाले होते. मात्र आता हे दर 150 ते 350 रुपयांनी झाली आहे .त्यामुळे लाल मिरीची सह जिराच्या दरात मोठी घसरण झाली आहे. लाल मिरचीची आवक जानेवारीपासूनच सुरू झाली असून दरही आवाक्यात असल्यामुळे गृहिनींना दिलासा मिळाला आहे.
नवी मुंबईतील APMC च्या घाऊक मसाला मार्केटमध्ये सध्या मसाला आणि लाल तिखटासाठी वापरल्या जाणाऱ्या लाल मिरच्यांची आवक वाढू लागली आहे. सध्या मिरचीच्या 20 ते 30 गाड्या दररोज घाऊक बाजारात येत आहेत. फेब्रुवारी ते एप्रिल या काळात बाजारात मिरच्यांची आवक वाढते. उन्हाळ्यात मसाला तयार करण्याचं काम होत असल्याने याच काळात मिरच्यांची आवकही वाढते. एप्रिलमध्ये बहुतेक शाळांच्या परीक्षाही संपलेल्या असतात. त्यानंतर बहुतेक जण फिरण्यासाठी बाहेर जात असल्याने अनेकांचा कल त्याआधीच लाल मसाला तयार करून घेण्याकडे असतो. त्यामुळे फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये मसाल्याच्या लाल मिरचीला जास्त मागणी असते. त्यानुसार बाजारात लाल मिरचीला मागणी वाढू लागली आहे. साधारणतः तीन महिन्याच्या कालावधीत मिरच्या बाजारात येण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. शिल्लक राहिलेली मिरची व्यापाऱ्यांकडून साठवली जाते, आणि वर्षभर त्याची विक्री करतात.
नवी मुंबईच्या APMC बाजारात सध्या लाला मिरचीची मोठी आवक होत असून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी राज्यांतून लाल मिरची बाजारात दाखल होत आहे. बाजारात बेडगी, गुंटूर, तेजा, चपाटा, रसगुल्ला, काश्मिरी, संकेश्वरीसह मागणी असलेली तिखट लवंगी मिरची उपलब्ध आहे. गेल्यावर्षी बेडगी 400 ते 700 रुपये होते आता 150 ते 350 रुपये प्रतिकिलो ,काश्मीर 600 ते 900 रुपये किलो होते आता 250 ते 450, पांडी 250 ते 300 रुपये होते आता 160 ते 210 रुपये प्रतिकिलो, तेजा 260 ते 300 रुपये किलो होते आता 190 ते 240, रेशम पट्टी 600 ते 800 रुपये होते आता 225 ते 425 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. तसेच जिऱ्याच्या दरात सुद्धा घसरण झाली आहे. गुजरातच्या उंझा गावातून जिऱ्याची आवक होत असते. 6 महिन्यांपूर्वी घाऊक बाजारात जिरं 450 ते 600 रुपये किलो झाले होते. मात्र आता हे दर 180 ते 300 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत लाल मिरचीसह जिऱ्याचा भावात मोठी घसरण झाली आहे. तर स्वच्छ केलेल्या, देठ तोडलेल्या मिरच्यांसाठी एका किलोमागे 20 ते 30 रुपये अधिक मोजावे लागतात, अशी माहिती विक्रेते अमरीशलाल बारोट यांनी दिली.
मिरच्यांचे प्रकार | सध्याचे दर | जुने दर |
बेडगी | 150 ते 350 | 400 ते 700 |
काश्मिरी | 250 ते 450 | 600 ते 900 |
पांडी | 160 ते 210 | 250 ते 300 |
तेजा | 190 ते 240 | 260 ते 300 |
रेशम पट्टी | 225 ते 425 | 600 ते 800 |
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world