
Maharashtra Weather Update: भीषण गर्मी आणि उकाड्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. खरंतर एप्रिल महिन्यापासून उन्हाळ्याला सुरुवात होते, मात्र उन्हाचा चटका मार्चच्या सुरुवातीपासूनच जाणवू लागला होता. एप्रिल ते जून काय होणार या विचारानेच मुंबईसह महाराष्ट्रातील जनता घामाघूम झाली होती. एप्रिलची सुरूवात सूर्याच्या अतिरेकी हल्ल्याने होईल या विचाराने गर्भगळीत झालेले महाराष्ट्रातील बहुतांश भागातील नागरीक मंगळवारी झोपेतून उठले तेव्हा त्याचे स्वागत पावसाने आणि ढगाळ वातावरणाने केले होते. सूर्याने सगळ्यांना एप्रिल फून बनवले खरे मात्र उकाड्याने हैराण जनतेसाठी हा सुखद धक्का होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बुधवारी वादळी वाऱ्यासह पाऊस:
मंगळवारी उकाड्याने त्रासलेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला. 39 डिग्री सेल्सियसच्या घरात असणारे कमाल तापमान 33-34 डिग्री सेल्सियसपर्यंत खाली आले होते. कमी झालेल्या तापमानानंतर मुंबईकरांना पावसामुळे आणखी दिलासा मिळेल असा अंदाज आहे. मंगळवारी संध्याकाळी गडगडाटासह पाऊस पडेल अशी शक्यता आहे. बुधवारी मुंबई उपनगरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट:
आयएमडी मुंबईच्या संचालिका शुभांगी भुते यांनी पीटीआयशी बोलताना महाराष्ट्राच्या काही भागांसाठी बुधवारी ऑरेंज अॅलर्ट दिल्याचे सांगितले. मुंबईमध्ये मंगळवारी आर्द्रता 80 टक्क्यांपेक्षा जास्त होती. भारतीय हवामान खात्याने मंगळवारप्रमाणेच बुधवारीही राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण कायम राहील आणि काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.
(नक्की वाचा - Gold Price : सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर; एक तोळ्याची किंमत 91 हजारांवर)
भुते यांनी म्हटले की आर्द्रता ही वाऱ्याच्या दिशेवर अवलंबून असते. वारे जर उत्तरेकडून किंवा पूर्वेकडून येत असतील तर ते आर्द्रतेसोबत धूलीकण आणि प्रदूषण करणारे घटकही सोबत घेऊन येतात. यामुळे धुरके निर्माण होते आणि यामुळे दृश्यमानता कमी होते. अशीच काहीशी स्थिती मंगळवारी सकाळी पाहायला मिळाली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world