शरद सातपुते, प्रतिनिधी
Sangli News : सांगली जिल्ह्यामध्ये एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या ठिकाणी खुनाची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. सांगली शहरातील लक्ष्मी मंदिर येथे थरारक पाठलाग करून सौरभ पवार या गुन्हेगाराचा निर्घृण खून करण्यात आला. तर जतमधील वळसंग येथे एका महिलेच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकून तसेच तिचे डोके दगडाने ठेचून खून करण्यात आला. तर जतमधीलच बिळूर येथे सामायिक जमीन आणि विहिरीच्या वादातून श्रीधर येलगोंडा याचा खून करण्यात आला. या घटनांमुळे मात्र सांगलीत खळबळ उडाली आहे.
सांगलीत तीन हत्यांनी खळबळ...
सांगली शहरातील मुख्य रस्त्यावर सोमवारी रात्री सौरभ पवार या गुन्हेगाराचा थरारक पाठलाग करून त्याच्यावर धारदार हत्यारांनी हल्ला करण्यात आला. शाहिद मुल्ला आणि आयान भिस्ती या दोघांनी त्याचा खून केल्याचे समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणी शाहीद मुल्ला याला पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य रस्त्यावरून थरारक पाठलाग करून खून झाल्याने सांगली शहरात खळबळ उडाली होती.
तर दुसरीकडे जत तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी खुनाच्या घटना घडल्या आहेत. वळसंग गावाजवळ भर दुपारी एका तीस वर्षीय महिलेच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकण्यात आले. त्यानंतर तिचे डोके दगडाने ठेचून तिचा खून करण्यात आला. तर जतमधील बिळूर येथे जमीन व सामायिक विहिरीच्या वादातून श्रीधर येलगोंडा याचाही भर दिवसा खून करण्यात आला. यानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. दरम्यान सांगली जिल्ह्यात एकाच दिवसात तीन खुनांच्या घटना घडल्यामुळे मात्र एकच खळबळ उडाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world