शरद सातपुते, सांगली
सांगली जिल्ह्यातील तासगावनजीक एका भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. तासगाव-भिलवडी मार्गावर झाला हा अपघात झाला. ज्यात दुचाकी आणि चार कारचा समावेश होता. या अपघातात एकाच कुटुंबातील आजी, आजोबा आणि नातवाचा अंत झाला आहे, ज्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
शिवाजी बापू सुतार (वय 57 वर्ष), आशाताई शिवाजी सुतार (55 वर्ष) आणि वैष्णव ईश्वर सुतार (वय 5 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण पलूस तालुक्यातील बुर्ली येथील रहिवासी होते. हे तिघेही दुचाकीवरून आपल्या नातेवाईकांना भेटून परत येत असताना, समोरून येणाऱ्या चारचाकीला त्यांची जोरदार धडक बसली, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
(नक्की वाचा- Crime News : कला केंद्र, नाच, iphone, पैसा अन्...बीडच्या विवाहित माजी उपसरपंचाची 'ती' च्या घरासमोर आत्महत्या)
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
या अपघातामुळे चारचाकी गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन द्राक्षबागेत कोसळली. या चारचाकीमधील चार जण जखमी झाले आहेत, ज्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. जखमी झालेले सर्वजण शिक्षक दिनाच्यानिमित्ताने कडेपूर येथे आयोजित एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहून तासगाव मार्गे सांगलीला परतत होते.
एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने बुर्ली गावावर आणि सुतार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.