शरद सातपुते, प्रतिनिधी
Sangli News : सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या एका गावात गुढीपाडव्यापासून गावची यात्रा संपेपर्यंत कोणत्याही प्रकारचं दळप कांडप केलं जात नाही. बेडगमध्ये श्री मरगाई देवीची यात्रेनिमित्ताने गेल्या 200 वर्षांपासून ही अनोखी परंपरा जोपासण्यात येत आहे. चवळी गावात कोणत्याही प्रकारचा पीठ दळलं जात नाही किंवा विहिरीवरची मोटार देखील सुरू केली जात नाही. पाहूया काय आहे ही अनोखो परंपरा.
महाराष्ट्रात प्रसिद्ध मिरज तालुक्यातील बेडग येथील ग्रामदैवत श्री मरगाई देवीची यात्रा सध्या सुरू झाली आहे. पण या गावात एक अशी परंपरा आहे, जी शेकडो वर्षांपासून आजची पिढी देखील जोपासत आहे. ती म्हणजे गावात आठ दिवस कोणत्याही प्रकारचं दळण कांडप केलं जात नाही, किंबहुना चक्राकार आकाराचे कोणतेही पदार्थ देखील बनवले जात नाहीत. गुढीपाडव्यापासून गावातली ग्रामदैवत असणारी श्री मरगाई देवीची यात्रा सुरू होते. त्या दिवशीपासून यात्रा संपेपर्यंत गावातील सर्व पीठ गिरण्या, कांडप मशीन किंबहुना विहिरीवरील मोट बंद ठेवले जातात. गावात कोणत्याही प्रकारचं पीठ दळलं जात नाही. गावातील महिला यात्रा सुरू होण्याच्या आधीच सर्व पीठ किंवा आवश्यक दळप-कांडप करून घेतात.
परंपरा कशी झाली सुरू?
मरगाआई देवीच्या यात्रेत गावातील ग्रामस्थ महिला यांचा सहभाग असावा, यात्रेदरम्यान महिला व ग्रामस्थ कोणत्याही कामात व्यस्त राहू नयेत यासाठी हा नियम केल्याचं सांगितलं जातं. दळप-कांडप आणि विहिरीवरची मोट बंद राहिल्यास सर्व ग्रामस्थ महिला यात्रेत सहभागी होऊ शकतात. या भावनेतून ही परंपरा सुरू झाल्याची आख्यायिका गावात सांगितली जाते. या यात्रेतलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात्रेचे मुख्य आकर्षण त्राटकी सोंग. रामायण कथेतील दंडकारण्याचे क्षेत्र हे फार मोठं होते. दंडोबा डोंगरासह बेडग ही दंडकारण्यात होतं. त्यामुळे या दंडकारण्यात रावणाची बहीण शृर्पणखा ( त्राटीका) ही या अरण्यात वास्तव्यास होती. त्यामुळे यात्रेच्या निमित्ताने त्राटकी सोंग काढली जातात. जे पाहण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील लाखो भक्त बेडकमध्ये आवर्जून उपस्थितीत लावतात.
गेल्या दोनशे वर्षांपासून बेडग गावात मरगाई देवीची यात्रा भरते. या यात्रेनिमित्ताने वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा ग्रामस्थ भक्ती भावाने जोपासतात आणि गावातल्या या यात्रेत मुक्तपणे सहभागी होतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world