सुजीत आंबेकर/ सातारा
रामनवमी हा सण देशभरात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. अयोध्येतही रामनवमी सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा केला जातो. अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीनंतर रामभक्तांचा आनंद द्विगुणित झाला आहे. त्यामुळे यंदा अयोध्येतील रामनवमी खास असणार आहे. रामनवमीनिमित्त साताऱ्यातील कंदी पेठे अयोध्येला पाठवले जाणार आहेत.
सातारा जिल्ह्याची ओळख असणारे सातारी कंदी पेढे जगप्रसिद्ध आहेत. सातारी कंदी पेढ्याला जगभरातून मागणी आहे. हेच कंदी पेढे यंदा रामनवणीनिमित्त अयोध्येत पाठवले जाणार आहे. कंदी पेढ्याचं नाव घेतलं तरी त्याची चव जिभेवर रेंगाळते. सातारी कंदी पेढे म्हणजे सातारकरांची आत्मीयता आणि जिव्हाळा. रामनवमीनिमित्त या कंदी पेढ्यांची चव अयोध्येत रामभक्तांना घेता येणार आहे.
सातारी कंदी पेढे अयोध्येला पाठवण्याची कल्पना साताऱ्यातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय सातारी कंदी पेढ्यांचे निर्माते मोदीज् नारायण पेढेवाले यांची आहे. त्यांच्या दुकानातील सुप्रसिद्ध असे कंदी पेढे अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या चरणी पाठवले जाणार आहेत.
सातारी कंदी पेढे अयोध्येला पाठवण्यामागची संकल्पना सांगताना निर्माते प्रशांत मोदी म्हणाले की, त्यांचे स्वप्न होते श्रीराम मंदिर पूर्ण झाल्यावर त्यांच्या हातून प्रभू श्रीरामाची सेवा घडावी. यासाठीच त्यांनी ही योजना आखली. 'मोदीज्'चे खास प्रिमिअम 1000 कंदी पेढ्यांचे बॉक्स अयोध्येला पाठवण्यात येणार आहेत. भक्तांनी या प्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन मोदी'ज् तर्फे करण्यात आले आहे.