राहुल कुलकर्णी, NDTV मराठी
Satara News: सातारा जिल्ह्यातील फलटण येथे एका 28 वर्षीय डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी तरुणीने तळहातावर सुसाईड नोट देखील लिहिली होती. ज्यात तिने पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेने आपल्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाला आता एक गंभीर आणि धक्कादायक वळण मिळाले आहे.
या महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी 19 जून 2025 रोजी फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) यांच्याकडे 4 पानांची लेखी तक्रार दिली होती. या तक्रारीत मृत डॉक्टरने काही पोलीस अधिकारी आपल्याला त्रास देत असल्याचा स्पष्ट उल्लेख केला होता. पीडित डॉक्टर तरुणीने 3 पोलीस अधिकाऱ्यांची नावे तक्रारीत नमूद केली होती. हे पत्र एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलं आहे.
(नक्की वाचा- Satara News: "माझ्यावर 4 वेळा बलात्कार केला..." पोलीस अधिकाऱ्यावर आरोप करत डॉक्टर तरुणीची आत्महत्या)
DYSP नी कारवाई का केली नाही?
पोलीस उपअधीक्षकांनी या पत्रावर कारवाई का केली नाही? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. 19 जून रोजी तक्रार दाखल होऊनही पोलीस उपअधीक्षकांनी या पत्राची आणि तक्रारीची दखल का घेतली नाही? जर वेळीच या तक्रारीवर कारवाई करण्यात आली असती, तर कदाचित ही दुर्दैवी घटना टळली असती, असे आता बोलले जात आहे.
तक्रारीतील महत्त्वाचे मुद्दे
मृत महिला डॉक्टरने तक्रारीत 'पोलीस आपल्याला बीडची म्हणून त्रास देत आहेत' असा उल्लेख केल्याचे सूत्रांनी सांगितले. आत्महत्येपूर्वी डॉक्टरने आपली ही आपबीती आपल्या डॉक्टर बहिणीलाही सांगितली होती. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करूनही त्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या दुर्लक्षामुळे संबंधित डीवायएसपींवर निलंबनाची कारवाई होणार का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
(नक्की वाचा- Pimpri Chinchwad: बायकोला नगरसेवक बनवायचे होते, तिनेच घात केला; नवऱ्याची गळा आवळून हत्या, कारण...)
धनंजय मुंडेंकडून SIT चौकशीची मागणी
या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. "ती मुंडे आहे व बीडची आहे म्हणून तिने केलेल्या तक्रारी वरिष्ठांनी डावलल्या असतील तर हे अतिशय गंभीर आहे," असे त्यांनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र SIT नेमून चौकशी करण्यात यावी, तसेच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले जावे, अशी मागणी करत मुंडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देणार आहेत.
पाहा VIDEO
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world