मंगेश जोशी, जळगाव
जळगावमधील वाढतं तापमान दिवसेंदिवस नागरिकांची चिंता वाढवत आहे. नागरिकांना बाहेर पडणे देखील कठीण बनलं आहे. उष्णतेची ही लाट पुढील आठवडाभर राहणार असल्याचा इशारा हवामान विभागने दिला आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वाढत्या तापमानामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी 144 कलम लागू केले आहे. सकाळी 11.30 ते सायंकाळी 4.30 या कालावधीत बाहेर जाणे नागरिकांनी टाळावे, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. वाढत्या तापमानामुळे कामगारांना काम करणे बंधनकारक करता येणार नाही. अत्यावश्यक सेवांमध्ये कामाच्या ठिकाणी पाण्याची सोय, पंखे, कुलर यासारख्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. कोचिंग क्लासेस चालकांनी विद्यार्थ्यांसाठी योग्य ती काळजी घेण्याचे आदेशही प्रशानसाने दिले आहेत.
(नक्की वाचा- मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 30 मेपासून पाणी कपात, मनपाने केले हे आवाहन)
जळगाव जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताचा धोका हा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी 25 मे पासून ते 3 जूनपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये हे आदेश लागू केले आहेत. उष्मघाताचा धोका लक्षात घेता सकाळी 11.30 ते सायंकाळी 04.30 या कालावधीत परिश्रम व जड मेहनत करणाऱ्या कामगारांकडून उन्हात काम करून घेणे बंधनकारक करता येणार नाही. कामगारांना याबाबत या कलमान्वये विशेष अधिकार देखील देण्यात आले आहेत.
अत्यावश्यक सेवांमध्ये कामाच्या ठिकाणी पाण्याची सोय, पंखे, कुलर यासारख्या उपाययोजना करणे बंधनकारक असून त्याची सर्व जबाबदारी संबंधित कंपनी अथवा मालकांची राहणार आहे. तर याबाबत कामगारांना काही तक्रार असल्यास ग्रामपंचायत, नगरपरिषद, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग यांच्याकडे करता येणार आहे.
(नक्की वाचा: संपूर्ण राज्य दुष्काळाने होरपळतंय, निवडणुका संपल्याने सरकारने आता त्याकडे लक्ष द्यावे : नाना पटोले)
तर खाजगी कोचिंग क्लासेस चालकांनाही सकाळी 10 वाजेपर्यंत कोचिंग क्लास सुरू ठेवता येणार आहेत. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या दरम्यान कोचिंग क्लास सुरू ठेवायचे असल्यास विद्यार्थ्यांसाठी योग्य ती काळजी घेऊन क्लासमध्येही पंखे कुलर व तत्सम साधनांची व्यवस्था करण्याची जबाबदारी कोचिंग क्लास चालकांची राहणार आहे.