पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सेवा, समर्पण आणि ग्रामविकासाचा विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने वडनगर ते वाराणसी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 'सेवा संकल्प यात्रे'चे अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे उत्साहात आगमन झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावन पुण्यभूमीत या यात्रेचे स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.
या यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रमात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तुकडोजी महाराजांच्या समाधीचे घेतले दर्शन
मोझरी येथे आगमन झाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचे आणि पवित्र गादीचे अत्यंत श्रद्धेने दर्शन घेतले. या प्रसंगी गुरुकुंज आश्रम परिसरात विविध सामाजिक आणि कल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
आश्रम परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. परिसराची स्वच्छता राखणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या सेवेचा गौरव करण्यात आला. गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रसंतांचा ग्रामोन्नतीचा विचार मोदीजी पुढे नेत आहेत" - रविंद्र चव्हाण
कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना रविंद्र चव्हाण म्हणाले की, "राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 'ग्रामगीता'च्या माध्यमातून ग्रामीण भारत सशक्त करण्याचा आणि ग्रामोन्नतीचा जो विचार दिला, तोच विचार आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी प्रत्यक्ष कृतीत आणून देशाचा विकास करत आहेत."
'सेवा परमो धर्मः' हा महामंत्र उराशी बाळगून केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व लोककल्याणकारी योजना समाजातील तळागाळातील व शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने कटिबद्ध राहावे, असे आवाहनही चव्हाण यांनी या वेळी केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world