पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुका जवळ आल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध संघटनात्मक बैठका घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आणि सरकारच्या लोककल्याणकारी योजना जनमानसात पोहोचवण्याचे आवाहन केले. त्यांच्या या दौऱ्यामुळे भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
उमेदवारांच्या प्रचाराला बळ
पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजप-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारासाठी रविंद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे निर्देश दिले. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत शैक्षणिक प्रश्न सोडवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली, आणि संघटनेने भाजप-महायुतीच्या उमेदवारांना आपला जाहीर पाठिंबा असल्याचे पत्र दिले.
कार्यकर्त्यांशी थेट संवाद, संघटनात्मक नियोजन आणि पक्षविस्तार यांवर भर देणारा रविंद्र चव्हाण यांचा हा दौरा सोलापूर जिल्ह्यात भाजप-महायुतीच्या प्रचाराला नवी दिशा देणारा ठरला. कार्यकर्त्यांचा वाढलेला उत्साह आणि एकजुटीच्या बळावर दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार अधिक मजबूत झाला आहे.
या दौऱ्यात मंत्री जयकुमार गोरे, प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार विजय देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, प्रदेश सचिव तथा माजी आमदार राम सातपुते, सोलापूर शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे, सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.