
महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि पत्रादेवी या तीन शक्तीपीठांना जोडणारा, महाराष्ट्रातील सर्वात लांब द्रुतगती मार्ग शक्तीपीठ एक्सप्रेस वे कसा असेल याबाबत सर्वांमध्येच उत्सुकता आहे. शक्तीपीठ एक्स्प्रेस वेच्या निमिर्तीनंतर नागपूर ते गोवा हे अंतर 1,110 वरून 760 किलोमीटरपर्यंत कमी होणार आहे. त्यामुळे 20 तासांचा प्रवास अवघ्या 8 तासांवर येणार आहे.
समृद्धी महामार्गानंतर आता राज्यात आणखी एक परिवहन क्रांती होणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रस्तावित केलेला हा महामार्ग 13 जिल्ह्यांतून जाणार आहे. मात्र एक्स्प्रेस वे पूर्ण करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. 2028-29 पर्यंत नागपूर-गोवा द्रुतगती मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल, असे मानले जात आहे. या एक्स्प्रेस वेच्या बांधकामासाठी 83,600 कोटी रुपये खर्च येणार आहे.
11 जिल्हे जोडले जाणार...
नागपूर-गोवा द्रुतगती महामार्ग विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागातून जाणार आहे. यात महाराष्ट्रातील यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्हे आणि गोव्यातील पत्रादेवी जिल्ह्याचा समावेश असेल.
हा एक्स्प्रेस वे तीन शक्तीपीठांना जोडणार असून तुळजापूर, माहूर, अंबेजोगाई शक्तीपीठ, कोल्हापूर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग, नांदेड साहिब, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गंगापूर आणि औदुंबर या तीर्थक्षेत्रांना ही जोडला जाणार आहे.
मोहोळ तालुक्याला होणार फायदा...
यापूर्वी चार राष्ट्रीय महामार्ग गेलेल्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून आता आणखी एक राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे. त्यामुळे या तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गाची संख्या आता पाचपर्यंत पोहोचली आहे. यापूर्वी मोहोळ तालुक्यातून मुंबई ते हैदराबाद, मोहोळ – पंढरपूर – आळंदी, सोलापूर – सांगली – कोल्हापूर आणि विजापूर असे चार महामार्ग गेले आहेत.
गोवा आणि महाराष्ट्राला फायदा...
या महामार्गामुळे गोवा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या एक्स्प्रेस वेमुळे व्यापार तसेच आयात-निर्यातीस मोठा वाव मिळणार आहे. ज्या ग्रामीण भागातून हा महामार्ग जाणार आहे, तेथे विकासाच्या संधी वाढणार आहेत. रोजगार आणि व्यवसायाबरोबरच अनेक संधी उपलब्ध होणार असून दोन्ही राज्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world