सुनिल दवंगे, प्रतिनिधी
Shirdi News: राज्यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर'च्या चर्चांदरम्यान शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याबाबत राजकीय घडामोडी वेगाने बदलत आहेत. मात्र या राजकीय घडामोडींचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांनाही बसत असल्याची तक्रार समोर येताय. वैद्यकीय एमरजेंसी असताना खासदारांची भेट होत नसल्याने आणि आवश्यक कागदपत्रांवर सही मिळत नसल्याने नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आलाय.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील गायकवाड कुटुंबाने खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या सध्याच्या अनुपस्थितीमुळे महत्त्वाच्या कामात अडथळा निर्माण झाल्यानं नाराजी व्यक्त केलीये.
काय आहे प्रकरण?
पंकज गायकवाड या रुग्णावर लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया होणार असून त्यासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलय. उपचारासाठी पीएम केअर्स निधीतून आर्थिक मदत मिळवण्यासाठी स्थानिक खासदारांच्या शिफारशीसह स्वाक्षरी आवश्यक असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
आवश्यक कागदपत्रांवर एक स्वाक्षरी मिळवण्यासाठी पंकज गायकवाड यांचे बंधू गेल्या तीन दिवसांपासून खासदार वाकचौरे यांच्या निवासस्थान आणि कार्यालयात वारंवार फेऱ्या मारत आहेत. मात्र त्यांची खासदारांशी भेट होऊ शकलेली नसल्याचा दावा त्यांनी केलाय. तसेच त्यांच्या स्वीय सहायकाकडून टाळाटाळ केली जात असल्यानं वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियेत विलंब होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
( नक्की वाचा : Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या नावावर ग्रामीण भागात नवा खेळ; एका मेसेजमुळे हजारो दूध उत्पादकांना टेन्शन )
'आपला माणूस' ओळख हरवली!
गेल्या काही दिवसांपासून खासदार वाकचौरे हे संपर्काबाहेर असल्याच्या चर्चाही सुरू होत्या. त्यातच अशा प्रकारच्या तक्रारी समोर आल्याने मतदारसंघातील काही नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
‘आपला माणूस आपल्यासाठी' ही ओळख निर्माण करणारे खासदार भाऊसाहेब वाकचौरे सध्या राजकीय चर्चांच्या केंद्रस्थानी असताना, या घडामोडींचा परिणाम मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांच्या कामांवर होऊ नये, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
( नक्की वाचा : Kalyan News: एका खरेदीनंतर संपले सुखी कुटुंब... कल्याणमधील धक्कादायक हत्येचं कारण उघड )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world