जाहिरात

Dharashiv News: "हळदी-कुंकू, डोहाळजेवण होणाऱ्या हॉलमध्ये उद्धव ठाकरेंची सभा"; शिंदे गटाची ठाकरेंवर टीका

Dharashiv News: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या धाराशिव दौऱ्यापूर्वी राजकीय वातावरण तापले असून, शिंदे गटाच्या युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य ॲड. अविनाश खापे पाटील यांनी त्यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे.

Dharashiv News: "हळदी-कुंकू, डोहाळजेवण होणाऱ्या हॉलमध्ये उद्धव ठाकरेंची सभा"; शिंदे गटाची ठाकरेंवर टीका

ओंकार कुलकर्णी, धाराशिव

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे धाराशिव दौऱ्यावर येत असून, त्यांच्या या दौऱ्यापूर्वीच जिल्ह्यातील राजकीय कलगीतुरा रंगू लागला आहे. शिवसेना (शिंदे गट) युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य ॲड. अविनाश खापे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. "ज्या सभागृहात कुंकू-टिळा किंवा डोहाळजेवणाचे घरगुती कार्यक्रम होतात, त्याच बंदिस्त हॉलमध्ये आता उद्धव ठाकरेंना सभा घेण्याची वेळ आली आहे," अशी घणाघाती टीका खापे पाटील यांनी केली आहे. उद्धव ठाकरे उद्या धाराशिव शहरातील सिद्धाई मंगल कार्यालयात पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करणार आहेत. 

बाळासाहेबांची सभांची परंपरा उद्धव ठाकरेंनी घालवली

ॲड. अविनाश खापे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा धाराशिवमध्ये यायचे, तेव्हा त्यांच्या सभा खुल्या मैदानावर प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत व्हायच्या. ती एक मोठी परंपरा होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमधील ती ऐतिहासिक परंपरा मोडीत काढली आहे. मैदान सोडून त्यांना आता एका मंगल कार्यालयाचा आसरा घ्यावा लागत आहे."

(नक्की वाचा-  Mysterious Blue Hole: खोल समुद्रात सापडलं 3200 वर्ष जुनं अनोखं विश्व; शास्त्रज्ञही झाले चकीत!)

"पक्ष फुटण्याच्या भीतीनेच उद्धव ठाकरेंचे दौरे"

खापे पाटील यांनी पुढे टीका करताना म्हटले की, उद्धव ठाकरे हे पक्ष वाचवण्यासाठी चालढकल करत आहेत. त्यांचे खासदार आधीच सोडून गेले आहेत, आणि आता उरलेले आमदारही पक्ष सोडतील या भीतीने ग्रासल्यामुळेच उद्धव ठाकरे यांना गल्लीबोळात दौरे करावे लागत आहेत. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमी खुल्या मैदानावर भव्य सभा घेऊन पक्ष आणि संघटना मजबूत करत आहेत, असा दावा त्यांनी केला.

(नक्की वाचा-  VIDEO: भयंकर! धावत्या स्कूल व्हॅनमधून 4 मुले रस्त्यावर पडली; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल)

"राज्यात एकच वाघ म्हणजे एकनाथ शिंदे"

ठाकरे गटावर थेट हल्लाबोल करताना खापे पाटील यांनी एक जुनी म्हण कोट करत एकनाथ शिंदेंची पाठराखण केली. ते म्हणाले, "वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा; या संपूर्ण महाराष्ट्रात आजच्या घडीला एकच वाघ आहे आणि ते म्हणजे एकनाथ शिंदे."

उद्धव ठाकरे यांच्या धाराशिवमधील उद्याच्या मेळाव्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गटाने आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचे या विधानांवरून स्पष्ट होत आहे. ठाकरे गटाकडून या टीकेला काय उत्तर दिले जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com