![Maharashtra Politics: शिवसेनेची नवी खेळी! दिल्लीत आमदारांचे स्नेहभोजन; 'डिनर डिप्लोमसी' मागचे राजकारण काय? Maharashtra Politics: शिवसेनेची नवी खेळी! दिल्लीत आमदारांचे स्नेहभोजन; 'डिनर डिप्लोमसी' मागचे राजकारण काय?](https://c.ndtvimg.com/2024-12/cglrahto_eknath-shinde-_625x300_01_December_24.jpg?im=FeatureCrop,algorithm=dnn,width=773,height=435)
रामराजे शिंदे, दिल्ली: संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन दिल्लीत सुरू आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय आमदार दिल्ली दौ-यावर आले आहेत. या सर्व आमदारांची संसद भेट आयोजित करण्यात आली आहे. संसदेत आमदारांचे प्रशिक्षण शिबीर घेतले जाणार आहे. या निमित्ताने शिवसेनेचे गटनेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्रातील सर्व आमदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण पाठवले.
यात उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनाही निमंत्रण पाठवले. मात्र, ठाकरे गटाच्या आमदारांनी श्रीकांत शिंदे यांच्या स्नेहभोजनाकडे पाठ फिरवली. एकीकडे आमदार खासदार फोडाफोडीचे दावे प्रतिदावे केले जात असतानाच या डिनर डिप्लोमसीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काय आहे या डिनर डिप्लोमसी मागचे राजकारण? वाचा..
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा?
शिवसेनेच्या आमदारांनी श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला हजेरी लावली. शिवाय त्याचवेळी श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी सर्व राज्यातील प्रमुखांची बैठक बोलवण्यात आली. यात खासदार आणि राज्यातील प्रमुखांना काम वाटप करून देण्यात आले. शिवसेनेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली. प्रत्येक राज्यात शिवसेनेचा विस्तार करून जास्तीत जास्त मतांची टक्केवारी वाढवण्यावर भर देण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले आहेत.
याबाबत माजी खासदार राहुल शेवाळे यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, “देशात शिवसेनेच्या नोंदणीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी त्या त्या प्रमुखांकडून सूचना मागवल्या आहेत. शिवसेनेला राष्ट्रीय पक्ष करण्यासाठी बैठकीत चर्चा झाली. शिवसेनेच्या विस्तारसाठी यापुढे कार्यक्रम आयोजित केले जातील. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे सुद्धा या कार्यक्रमात सहभागी असतील.”
( नक्की वाचा : Maha Kumbh 2025 : महाकुंभमेळ्याबाबत पाकिस्तानमध्ये सर्च का केले जात आहे? समजून घ्या खरा अर्थ )
श्रीकांत शिंदेंची रणनीती?
शिवसेना गटनेते आणि खासदार यांच्या निवासस्थानी डिनर डिप्लोमसी होणं आणि महायुतीचे आमदार खासदार उपस्थित राहणं यामागे पुढील रणनीती दडली आहे. श्रीकांत शिंदे यांचे निवासस्थान महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी आता श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावर पक्ष संघटना कामाला लागली आहे. यापूर्वी शिवसेना फुटीवेळी दिल्लीतील ठाकरेंचे खासदार आपल्याकडे वळवण्याची मोहीम श्रीकांत शिंदे यांनी आखली आणि यशस्वी केली.
आता पक्षाला राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण करून देण्यासाठी श्रीकांत शिंदे यांनी डिनर डिप्लोमसी आखली आहे. याचाच भाग म्हणून ठाकरेंच्या आमदारांना निमंत्रण देणं ही खेळी आहे. यातून शिवसेना सर्वसमावेशक आणि मराठी संस्कृतीला धरून असल्याचा संदेश श्रीकांत शिंदे यांनी दिलाय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world