जाहिरात

Maharashtra Politics: 'धाडसी, दिलदार नेतृत्व...', सामनातून राहुल गांधींवर स्तुतीसुमनं, भाजपवर टीकास्त्र

Saamana Editorial On Rahul Gandhi: काँग्रेसने अनेक चुका केल्या. त्या वेळी मी पक्षात नव्हतो, पण जर काही चुकले असेल तर मी जबाबदारी घेतो,' असे सांगण्यास धाडस आणि वाघाचे काळीज लागते.

Maharashtra Politics: 'धाडसी, दिलदार नेतृत्व...', सामनातून राहुल गांधींवर स्तुतीसुमनं, भाजपवर टीकास्त्र

मुंबई: राहुल गांधी यांनी काँग्रेसने इतिहासात केलेल्या चुकांची जबाबदारी स्वीकारली व ते पुढे गेले. याला म्हणतात धाडस, दिलदारी व नेतृत्व. भाजप नेतृत्वाकडे या गुणांचा लवलेशही नाही.. अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाकडून काँग्रेस नेते राहुल गांधींवर स्तुतीसुमने उधळण्यात आली आहेत. ठाकरे गटाच्या मुखपत्र असलेल्या सामनामधून राहुल गांधींचे कौतुक करण्यात आले असून भाजपवर जोरदार टीकास्त्रही सोडले आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय आहे सामना अग्रलेख?

राहुल गांधी यांनी देशाच्या राजकारणावर स्वतःचा ठसा उमटवायला सुरुवात केली आहे व हे ठसे कायमस्वरूपी राहतील. मोदी व शहांनी देशात विद्वेषाचे राजकारण सुरू केले. मात्र राहुल गांधी यांनी त्याला छेद देणाऱ्या 'मोहोब्बत के दुकान'चे राजकारण सुरू केले. गांधी यांनी आता सांगितले की, “काँग्रेसने अनेक चुका केल्या. त्या वेळी मी पक्षात नव्हतो, पण पक्षाने इतिहासात जे काही चुकीचे केले त्याची जबाबदारी मी आनंदाने घेतो.

" गांधी यांनी जे सांगितले ते सांगण्यास 56 इंचाची छाती लागते व गांधी यांच्याकडे ती आहे हे त्यांनी अलीकडे वारंवार दाखवून दिले. 1984 च्या शीखविरोधी दंग्याविषयी व त्याआधीच्या 'ऑपरेशन ब्लू स्टार'च्या बाबतीत राहुल गांधींनी जे मत मांडले ते धक्कादायक आहे. शिखांच्या भावनांना धक्का पोहोचवणाऱ्या या कृती होत्या. 'ही पक्षाची चूक असेल तर त्याची जबाबदारी मी घेतो. काँग्रेसने अनेक चुका केल्या. त्या वेळी मी पक्षात नव्हतो, पण जर काही चुकले असेल तर मी जबाबदारी घेतो,' असे सांगण्यास धाडस आणि वाघाचे काळीज लागते.

(नक्की वाचा- Ajit pawar vs Shivsena: "दादा'गिरीमुळे शिंदेसेनेत अस्वस्थता! शिंदे सेनेत उद्रेक होणार?)

अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात भिंद्रनवाले हा त्याच्या फौजफाट्यासह बसला होता. त्याने सगळ्यांना वेठीस धरले होते. सुवर्ण मंदिरात बसून तो खलिस्तानचे फूत्कार सोडीत होता व शीख समुदायाची माथी भडकवत होता. पाकिस्तानचे त्याला समर्थन होते. अशा वेळी भिंद्रनवाले व त्याच्या खलिस्तानी फौजांचा खात्मा करणे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भिंद्रनवालेचा खात्मा करण्यासाठी सुवर्ण मंदिरात सैन्य व रणगाडे घुसवले. पंतप्रधान इंदिरा गांधींनी धाडसाने ते ऑपरेशन ब्लू स्टार घडवले, त्याची किंमत त्यांनी प्राण देऊन चुकवली.

आज घडणाऱ्या घटना धक्कादायक आहेत. जवान व निरपराध लोक दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मारले जात आहेत. या चुकांची जबाबदारी घेऊन अमित शहांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, पण चुका मान्य करण्याची दानत भाजपमध्ये नाही. आपण जणू आकाशातील झग्यातून पडलो आहोत, अशा गुर्मीत भाजपवाले वावरत असतात. त्यामुळे चुका मान्य करणे वगैरे त्यांच्या चौकटीत बसत नाही. पुलवामा आणि पहलगाम हत्याकांडाची जबाबदारी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांनाच घ्यावी लागेल, पण चुका आणि जबाबदारी स्वीकारण्याचे जे साहस राहुल गांधी दाखवतात ते साहस भाजप नेतृत्वात दिसत नाही.

(नक्की वाचा- Pahalgam attack: पाकिस्तानची टरकली! 'फतह' या क्षेपणास्त्राची केली चाचणी, 3 दिवसात 2 चाचण्या)

 भाजप हा हिंदुत्वाचा विचार आणि संस्कृतीवाहक नाही, तर ठेकेदार आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी हिंदू विरोधकांच्या शेजेवर चढण्यासही ते तयार असतात. याबाबतीत त्यांनी निर्लज्जपणाचा कहर चालवला आहे. सर्व पक्षांतील भ्रष्ट आणि व्यभिचारी लोकांना, गुंड टोळ्या चालवणाऱ्यांना भाजपने आपल्या पक्षात घेतले. ही चूक आहे असे त्यांना वाटत नाही. 'काँग्रेस रिकामी करा व भाजप वाढवा', असा दिव्य मंत्र महाराष्ट्रात त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. या चुकांची जबाबदारी घेण्याची हिंमत दाखवणारा नेता भाजपमध्ये आज नाही, असा टोलाही सामनामधून लगावला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com