जाहिरात
This Article is From Dec 08, 2024

धक्कादायक! पश्चिम विदर्भात 11 महिन्यात 985 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सर्वाधिक 317 शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत. त्यानंतर अमरावती जिल्ह्यात 219, अकोला जिल्ह्यात 147, बुलढाणा जिल्ह्यात 208, वाशिम जिल्ह्यात 94 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. 

धक्कादायक! पश्चिम विदर्भात 11 महिन्यात 985 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

शुभम बायस्कार, अमरावती

राज्यातील नेते मंडळी आणि प्रशासन विधानसभा निवडणुकीत व्यस्त असताना पश्चिम विदर्भात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 60 दिवसात  तब्बल  197 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं आहे. एकूण 11 महिन्यात पश्चिम विदर्भात 985 शेतकऱ्यांनी  आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी  अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली आहे. त्यामुळे विदर्भातून येणारे राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या समोर शेतकरी आत्महत्या रोखण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. 

शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.  सोयाबीन, कपाशीला हमीभाव नाही, कर्जबाजारी, शासकीय योजनेचा लाभ नाही  व आर्थिक अडचणीमुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याची माहिती समोर आली आहे. 

सर्वाधिक 317 शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत. त्यानंतर अमरावती जिल्ह्यात 219, अकोला जिल्ह्यात 147, बुलढाणा जिल्ह्यात 208, वाशिम जिल्ह्यात 94 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. 

शेतकरी आत्महत्येची आकडेवारी

  • पात्र शेतकरी आत्महत्या - 306
  • अपात्र शेतकरी आत्महत्या - 287
  • चौकशीसाठी  प्रलंबित प्रकरणे - 392
  • एकूण शेतकरी आत्महत्या -985

शेतकरी आत्महत्या चिंतेचा विषय

पश्चिम विदर्भात  11 महिन्यात तब्बल 985 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. यात विधानसभा निवडणुकीदरम्यान  197 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने लोकप्रतिनिधी वर शासन आता तरी जागा होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. यावर अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी प्रतिक्रिया दिली की, शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. शेतीमालाला भाव नाही, उत्पन्न नाही त्यामुळं सरकारने शेतकऱ्याकडे लक्ष द्यावे. शेतकरी हा केंद्रबिंदू समजून येणाऱ्या काळात सरकारने यावर काम करावं अशी मागणी बळवंत वानखडे यांनी केली.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com