
निनाद करमारकर, मुंबई: अंबरनाथ तालुक्यातील सहा शाळांना शिक्षण विभागाने अनधिकृत घोषित केलं आहे. तसंच या शाळांमध्ये ऍडमिशन घेऊ नये, असं आवाहन पालकांना केलं आहे. या शाळांविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे देखील दाखल करण्यात आले असून शिक्षण विभागाने कसून चौकशी केल्यास आणखी अनेक अनधिकृत शाळा सापडतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर शहरातल्या ३, तसंच वांगणी मधल्या ३ शाळांचा या अनधिकृत शाळांमध्ये समावेश आहे. यात बदलापूरच्या शिरगाव परिसरातील श्री चैतन्य टेक्नो स्कूल, पनवेल हायवेवरील अनिरुद्ध हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, सोनिवलीतील स्टारलाईट इंटरनॅशनल स्कूल, तसंच वांगणीच्या कुडसावरे मधील नेसम इंग्लिश मीडियम स्कूल, डोणे गावातील रुद्र इंटरनॅशनल स्कूल आणि वांगणीतील नवजीवन इंटरनॅशनल स्कूल या सहा शाळांचा समावेश आहे.
या शाळांना वर्ग भरवण्यासाठी शासनाची कोणतीही मान्यता नसून त्यामुळे त्यांना अनधिकृत घोषित करत कोणत्याही पालकांनी या शाळांमध्ये आपल्या मुलांचे प्रवेश घेऊ नयेत, असं प्रसिद्धी पत्रक अंबरनाथ पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी जारी केलं आहे. तसंच या शाळांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं, तर त्याला शासन जबाबदार राहणार नाही, असंही या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे. इतक्यावरच न थांबता बदलापूर पूर्व, पश्चिम आणि ग्रामीण पोलीस ठाण्यांमध्ये या शाळांच्या विरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.
( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi : आयपीएलचा इतिहास बदलला, 14 वर्षाच्या मुलानं केलं पदार्पण, पहिल्याच मॅचमध्ये खणखणीत सुरुवात )
दरम्यान, अंबरनाथ तालुक्यात अनेक अनधिकृत शाळा असून शिक्षण विभागाने कसून चौकशी केल्यास आणखी अनेक अनधिकृत शाळा सापडतील आणि मुलांचं शैक्षणिक नुकसान होण्यापासून वाचेल. त्यामुळे शिक्षण विभागाने कसून चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अविनाश देशमुख यांनी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world