संजय तिवारी, प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. मानव यांच्या नागपूरमधील कार्यक्रमात हा प्रकार घडला. 2014 पासून महाराष्ट्रात आणि देशात लोकशाही हक्कांची पायमल्ली होत आहे अशा अर्थाचे वक्तव्य मानव यांनी केलं होतं. त्यावर भाजपा कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्यांनी मानव यांना प्रश्न विचारले. तसंच या विषयावर गोंधळ घातला. शिवाणी दाणी आणि अन्य कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाहेर काढलं. त्यावेळी भाजपा कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्यांना बाहेर काढल्यानंतर श्याम मानव यांनी त्यांचं भाषण पूर्ण केलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले श्याम मानव?
श्याम मानव यांनी या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसंच भारतीय जनता पार्टीला लक्ष्य केलं. संविधान नसते तर नितीन गडकरी कुठे तरी पूजा करीत असते किंवा धार्मिक कथा सांगत असते, ते रोडकरी कधीच होऊ शकले नसते, असा टोला त्यांनी लगावला. सर्व राज्यकर्ते पंतप्रधान हिंदू असताना यांना वेगळे हिंदू राष्ट्र कां आणायचे आहे? असा सवाल मानव यांनी या भाषणात उपस्थित केला. देवा भाऊ (देवेंद्र फडणवीस) यांचे समर्थन करणारे ओबीसी शाहू फुले आंबेडकरांचे समर्थन करणारे आहेत की मनूस्मृतीचे समर्थन करतात असंही त्यांनी विचारलं.
( नक्की वाचा : परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष निवडीवरून ब्राह्मण समाजात नाराजी, अजित पवारांना घरचा आहेर )
धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्या पाया देवेंद्र फडणवीस पडले. या महाराजांनी नागपुरात Drugs and magic remedies act आणि जादूटोणा विरोधी कायदा यांचे उल्लंघन केले. मात्र, भरपूर वेळ घेऊन अभ्यास केल्यावर पोलिसांनी विचित्र उत्तर दिले.
या देशातील संविधान गेले तर आपल्या हातात गाडगे आल्याशिवाय राहणार नाही. आपली वासलात लागल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार असले तरीही त्यांचे फार काही चालत नाही. मंत्रलायात फक्त देवा भाऊंचे चालते, असा आरोपही त्यांनी केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world