Solapur Heavy Rain : राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने कहर केला आहे. सोलापुरात तर अतिवृष्टीमुळे शेतीच्या शेती पाण्याखाली गेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 38 गावांना पूरस्थितीने वेढले असून आतापर्यंत 3603 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. हजारो घरे पाण्याखाली गेली असून हजारो हेक्टरवरील शेती उद्ध्वस्त झाली आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. माढा, मंगळवेढा आणि बार्शी तालुक्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान पूरस्थिती पाहता आज 24 सप्टेंबरलाही सोलापुरात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सोमवारी रात्री जिल्ह्यातील 20 मंडळांमध्ये मुसळधार पाऊस झाला. विशेषतः माढा तालुका सर्वाधिक बाधित झाला असून तेथे सैन्य, एनडीआरएफ आणि हवाईदलाच्या मदतीने बचावकार्य करण्यात आले. हेलिकॉप्टरद्वारे 10 जणांना वाचवण्यात आले, तर वकव आणि उंदरगाव येथे चार बोटींच्या साहाय्याने बचावकार्य सुरू आहे.
नक्की वाचा - Maharashtra Rain: सप्टेंबरमध्येही पावसाचा कहर सुरूच! हवामान विभागाचा नवा अंदाज, 'या' तारखेपर्यंत मुसळधार पाऊस
सोलापूर-पुणे महामार्ग बंद
सीना नदीवरील लांबोटी येथील जुन्या पुलावर पाणी आल्याने सोलापूर–पुणे महामार्ग बंद करण्यात आला. रात्री 8 वाजता जड वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली. विजयपूर–सोलापूर महामार्गावरील हत्तूर पुलावरही पाणी आल्याने तो बंद करावा लागला. रेल्वे प्रशासनाने सीना नदीवरील पुलावरून धावणाऱ्या गाड्यांचा वेग ३० किमी प्रती तास इतका कमी केला आहे. प्रशासनाने मंगळवारी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. बुधवारी (24 सप्टेंबर) उत्तर सोलापूर, हिप्परगा, माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी, मंद्रूप या भागातील शाळा बंद राहणार आहेत.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माढा व करमाळा तालुक्यांतील पूरग्रस्त भागाची पाहणी केली व शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि मध्य महाराष्ट्रावर निर्माण झालेल्या चक्रीवादळासदृश वाऱ्याच्या स्थितीमुळे हा पाऊस झाला. पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.

बार्शी तालुक्यातील घाटणे शाळेचे कार्यवाहक मुख्याध्यापक संतोष गाडेकर हे मोटारसायकलसह पाण्यात वाहून गेले. त्यांचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला. मंगळवेढा तालुक्यातील बावळस येथे एका मुलासह ३ जणांचा मृत्यू झाला. माढा तालुक्यातील दारफल गावातील 10 जणांना हेलिकॉप्टरने वाचवण्यात आले. पंढरपूरजवळ एका भावंडांवर भिंत कोसळल्याने अपघात झाला; भाऊ जागीच ठार झाला तर बहीण जखमी अवस्थेत खाजगी रुग्णालयात दाखल आहे.

पूरस्थिती आणि नुकसान
• जिल्ह्यातील सुमारे दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
• 3 दिवसांत 3 जणांचा मृत्यू (माढा, बार्शी, मंगळवेढा)
• लांबोटी, तिन्हे, हत्तूर येथे महामार्ग बंद
• 38 गावे पाण्याखाली, 3603 जणांना सुरक्षित स्थळी हलवले
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world