जाहिरात

निवडणुकीची तयारी करणाऱ्या तृतीयपंथीयाला पाहताच नियत फिरली, इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यासह तिघांना अटक

Solapur Municipal Corporation Election News: तीनही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

निवडणुकीची तयारी करणाऱ्या तृतीयपंथीयाला पाहताच नियत फिरली, इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यासह तिघांना अटक
सोलापूर:

सौरभ वाघमारे

Solapur Crime News: राजकारणात प्रवेश करून लोकांची सेवा करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या एका तृतीयपंथीयाचा अंत अत्यंत दुर्दैवी पद्धतीने झाला आहे. सोलापूरच्या लष्कर परिसरातील रहिवासी अयूब सय्यद यांचा त्यांच्याच मित्र म्हणवून घेणाऱ्या तिघांनी सोन्याच्या दागिन्यांसाठी खून केला. पोलिसांनी केवळ 6 तासांत तपास पूर्ण करत मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

नक्की वाचा: हनिमून ते मृत्यू... बायकोच्या आत्महत्येनंतर नवऱ्यानेही आयुष्य संपवलं, आईचीही मृत्यूशी झुंज

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होता अयूब सय्यद (Ayub Sayyad Instagram )

अयूब सय्यद हे सोशल मीडियावर विशेषतः इंस्टाग्रामवर प्रचंड लोकप्रिय होते. त्यांचे लाखो फॉलोअर्स असून, त्यांनी आपल्या प्रचाराचे व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली होती. प्रभाग 16 मधून महापालिका निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक होते. मात्र, त्यांच्या अंगावरील सोने आणि घरातील रोकड पाहून आरोपींची नियत फिरली. आरोपींमध्ये एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा समावेश असल्याने सुशिक्षित तरुणांच्या वाढत्या गुन्हेगारी मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

स्कूटी आणि सोन्याच्या दागिन्यांच्या मोहापायी केली हत्या

शुक्रवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास यशराज कांबळे हा अयूब यांच्या घरी आला होता. त्यानंतर आफताब शेख आणि वैभव पनगुले हे दोघेही तिथे पोहोचले. ओळखीचा फायदा घेत आरोपींनी घरात प्रवेश केला. प्राथमिक माहितीनुसार, या तिघांनी मिळून अयूब यांचे उशीने तोंड दाबून त्यांची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपींनी घरातील सोन्याचे दागिने, रोकड, मोबाईल आणि अयूब यांची यामाहा स्कूटी घेऊन तिथून पळ काढला. शनिवारी दुपारी जेव्हा अयूब घराबाहेर आले नाहीत, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

नक्की वाचा: ग्रहदशा सुधारण्यासाठी इच्छुक उमेदवारांची ज्योतिषाकडे धाव, कोणत्या अनुष्ठानाला जास्त मागणी?

6 तासांत आरोपींना अटक

घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त आणि सहायक पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तीन संशयित मध्यरात्री 2 च्या सुमारास घराबाहेर पडताना दिसले. तांत्रिक विश्लेषणातून आरोपी लातूरच्या दिशेने गेल्याची खात्री पटली. सोलापूर गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने लातूर गाठले आणि तिथल्या विवेकानंद चौक पोलिसांच्या मदतीने यशराज उत्तम कांबळे (21), आफताब इसाक शेख (24) आणि वैभव गुरूनाथ पनगुले या तिघांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी वैभव पनगुले हा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. या तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com