
मनोज सातवी
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील विद्यार्थ्यांचा रोजचा शाळेचा प्रवास म्हणजे जणू मृत्यूच्या दाढेतून जाणं असाच म्हणाला लागेल. नाकारपाडा आणि जुगरे पाड्यातील विद्यार्थ्यांना वाहत्या राखाडी नदीवरून शाळेत जाण्यासाठी दररोज जीवावर उदार व्हावं लागतं. बांधाऱ्यावरून जीव मुठीत घेवून त्यांना शाळा गाठावी लागते. पण नदीला पूर आल्याने बांधाऱ्यावरून जाण्याची हिम्मत हे विध्यार्थी करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांची शाळेला दांडी पडत आहे. या ठिकाणी पूल बांधण्याची मागणी गावकऱ्यांनी केली असली तरी अद्याप प्रशासन गप्प आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )

सारे शिकुया पुढे जाऊया. हे देशाच्या सर्व शिक्षा अभियानाचं ब्रिदवाक्य आहे. पण पालघरमधल्या शाळकरी मुलांचा शिक्षणाकडे जाणारा रस्ता फारच भयावह आहे. मुलं जीव मुठीत घेऊन, एकमेकांचा हात हातात धरून उफानलेली नदी पार करतात. मुलांना शाळा गाठण्यासाठी राखाडी नदीवरचा बांध पार करावा लागतो. हे अतिशय जिकरीचं आणि खतरनाक आहे. वाडा तालुक्यातील नाकारपाडा आणि जुगरे पाड्यातील विध्यार्थांच्या हे पाचवीला पुजलेलं आहे. या मुलांना गारगाव येथील शासकीय आश्रम शाळा गाठण्यासाठी वाहत्या राखाडी नदीवरच्या बांधाऱ्यावरून चालत जावं लागतं.

चिमुकल्यांना शाळा गाठायची असल्याने नाईलाजाने हा बंधारा पार करावाच लागतो. नाही गेलं तर शाळा बुडणार, अभ्यास बुडणार. शिकायचं तर आहे त्यामुळे त्यांना हा बंधारा पार करावाच लागतो. पाय घसरला, की थेट नदीत पडण्याचा इथं धोका आहे. तरीही रोजचा प्रवास अशाच मार्गाने करावा लागत आहे. शाळकरी मुलं असोत, कि आजारी रुग्ण किंवा गर्भवती महिला. गारगाव येथे जायचं झालं, तर रस्त्याने पाच किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. त्यात वेळ आणि थकवा दोन्ही वाट्याला येतो. म्हणूनच विद्यार्थी थेट नदी पार करून शाळेत पोहोचतात. त्यामुळे इथे एक पुल व्हावा अशी मागणी विद्यार्थी आणि गावकरी ही करत आहे.

वाडा तालुक्यातील नाकारपाडा आणि जुगरे पाड्याच्या ग्रामस्थांनी अनेक वेळा शासन दरबारी ही मागणी मांडली. पण दरवर्षी पावसाळा आला, की त्याच बंधाऱ्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागतो. पुराच्या पाण्यात बांधारा दिसेनासा होतो. मग शिक्षण थांबतं. विशेष म्हणजे या विध्यार्थ्यांना गारगाव येथील शासकीय आश्रम शाळेच्या वसतिगृहात प्रवेश देण्याची मागणी पालकांनी केली आहे. मात्र शाळेपासून पाच किलोमीटर अंतराच्या आतील विध्यार्थ्यांना प्रवेश न देण्याचा नियमाची अडचण आहे. त्यात नियमांवर बोट ठेऊन आदिवासी विकास विभागाच्या या शासकीय वासतिगृहात या विध्यार्थाना प्रवेश नाकारल्याचे पालकांनी सांगितलं आहे.

प्रसार माध्यम्य या विध्यार्थ्यांच्या जीवघेण्या प्रवासाबाबत बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. कागदी घोडे नाचले आणि या विध्यार्थ्यांना गारगाव येथील शासकीय आश्रम शाळेच्या वसतिगृहात प्रवेश देण्यात आल्याचे मुख्याध्यापक सुरेश बनसोडे यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असो की शिक्षणाचा हक्क, दोन्ही बाबतीत शासन अपयशी ठरल्याचा आरोप इथलं ग्रामस्थ करतात. नाकारपाडा आणि जुगरे पाड्याच्या गावकऱ्यांची एकच मागणी आहे ती म्हणजे या राखाडी नदीवर कायमस्वरूपी पूल बांधावा. तसं झाल्यास या विध्यार्थ्यांचे होणारे हाल थांबतील. आता सरकार त्याकडे कशा पद्धतीने पाहतं ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world