
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्या समोर जय गुजरातचा नारा दिला. त्यानंतर राज्यातलं राजकारण आणखी तापलं आहे. विरोधकांनी एकनाथ शिंदेंना घेरलं आहे. एकीकडे विरोधक शिंदेना घेरत असताना दुसरीकडे शिंदेंच्याच शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनीही त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत घरचा आहेर दिला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र शिंदेंना सावरून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व घडामोडी पाहाता शिंदेंची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एकनाथ शिंदेंच्या जय गुजरात नाऱ्याचा समाचारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतला आहे. जय गुजरातचा नारा माजी मुख्यमंत्र्यांनी दिला. याचा अर्थ महाराष्ट्र गुजरातला विकण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. त्यावर या सर्वांचे सही शिक्के मारले आहेत, हे सिद्ध झालं अशी कडवट टीका राऊत यांनी केली आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. आपल्या मालकाच्या समोर जय गुजरात म्हणणे, यावरून त्यांच्या मनात काय चाललं आहे हे समजते असं ही राऊत म्हणाले. शिंदे हे डुप्लिकेट आहेत. शहा हेच त्यांचे पक्ष प्रमुख आहेत. बाकीचे सर्व शहा सेनेचे सरदार आहेत. महाराष्ट्राचे भवितव्य कोणाच्या हातात या लोकांनी दिलं आहे हे त्यांनी आता दाखवून दिलं आहे.
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीही या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे जय गुजरात का म्हणाले माहीत नाही. पण त्यांनी असे म्हणायला नको होते, मला ते आवडलं नाही. अशा शब्दात रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांना फटकारलं आहे. रामदास कदम हे नेहमीच स्पष्ट बोलता. त्यांच्या बोलण्याने अनेक वेळा पक्षाच्या नेत्यांचीही कोंडी झाली आहे. अनेक वेळा त्यांनी थेट भाजप विरोधात ही भूमीका घेतली आहे. यावेळी तर त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यावरच नाराजी व्यक्त केली आहे.
पुण्यात एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यासमोर जय गुजरातची घोषणा दिली. यावरुन शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी NDTV मराठीशी बोलताना त्यावर प्रतिक्रिया दिली.#eknathshinde #ramdaskadam #ndtvmarathi pic.twitter.com/tOOnTLeZZr
— NDTV Marathi (@NDTVMarathi) July 4, 2025
मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची बाजू उचलून धरत सारवा-सारव करण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले की मी तुम्हाला आठवण करून देतो, शरद पवार हे कर्नाटक येथे जय कर्नाटक म्हटले होते. जिथं जोतो, तिथं जय बोलतो. तो कार्यक्रम गुजरातचा कार्यक्रम होता. त्यामुळे एकनाथ शिंदे तिथे जय गुजरात बोलले असं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला. ते पुढे म्हणाले मराठी माणूस संकोचित नाही. वैश्विक विचार आपल्याला करावा लागेल असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world