ठाणे जिल्हा एका भयंकर घटनेमुळे हादरला आहे. ठाणे जिल्ह्यात एका वृद्ध महिलेवर अत्याचार करून तिला ठार मारण्यात आले. भिवंडी तालुक्यातील ही घटना असून मृत महिला 65 वर्षांची असल्याचे सांगण्यात आले आहे. गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
नक्की वाचा: मुदत संपलेली बिअर पिणे महागात पडलं, मद्यपीवर रुग्णालयात उपचार सुरू
शेतात आढळला महिलेचा मृतदेह
मृत वृद्ध महिलेचा मृतदेह तिच्या शेतात आढळून आला, त्यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. गणेशपुरी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलीस उपअधीक्षक राहुल झाल्टे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या गळ्यात सुमारे 5 ते 6 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने होते, जे तिच्या अंगावरच होते; त्यामुळे या गुन्ह्यामागे चोरीचा हेतू नसावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेचा तपास सुरू
या गंभीर प्रकरणाची माहिती देताना पोलीस उपअधीक्षक राहुल झाल्टे म्हणाले की, “एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्याच्यावर बलात्कार तसेच हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” सध्या या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
मैत्रिणीला जाळले, अल्पवयीन आरोपी ताब्यात
ठाण्यात गेल्या शुक्रवारी म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी एका अल्पवयीन मुलीला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी तिच्या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पीडिता ही 80 टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
नेमके काय घडले ?
17 वर्षांची पीडिता ही कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास आहे. यापूर्वी ती मुंबईतील चेंबूर भागात राहात होती. चेंबूरमध्ये राहात असताना तिची ओळख तिथल्याच एका मुलासोबत झाली होती. पीडिता ही भाऊबीजेसाठी चेंबूरला गेली होती तेव्हा तिच्या मित्राने तिला गाठून वाद घातला होता आणि मारहाणही केली होती. मुलीच्या घरच्यांना ही बाब कळाली असता ते मुलीच्या बचावासाठी गेले होते. यावेळी त्यांनी या मुलाला पकडण्याचाही प्रयत्न केला होता. पळून जात असताना या मुलाने पीडितेला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती.
नक्की वाचा: पाण्याच्या बिलाची रक्कम 250 कोटींच्या घरात, वसुली करताना ठाणे महापालिकेच्या नाकी नऊ आले
शुक्रवारी म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी ही मुलगी घरात एकटी होती. अचानक तिच्या घरातून धूर येऊ लागला, ही माहिती आजूबाजूच्यांनी तिच्या आईला दिली. जेव्हा आई घरी पोहोचली तेव्हा त्यांना त्यांची मुलगी जळताना दिसली. विशेष म्हणजे ज्या मुलाने तिला मारहाण केली होती, तो देखील घरातच होता. मुलीच्या आईला पाहताच तो पळून गेला होता. सदर प्रकाराबद्दलचा गुन्हा कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.