अमजद खान, कल्याण
कल्याण पश्चिम परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक्सपायरी डेट (मुदत संपलेली) असलेली बिअर प्यायल्याने एकाची तब्येत अचानक बिघडली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर तातडीने कारवाई करत कल्याण उत्पादन शुल्क विभागाने संबंधित बिअर शॉपमधील मुदत संपलेला मोठा साठा जप्त केला आहे.
काय आहे नेमकी घटना?
कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात राहणारे अजय म्हात्रे यांनी सोमवारी रात्री कल्याण पश्चिमेतील प्रेम आटो परिसरातील 'रियल बिअर शॉप' येथून दोन बिअरच्या बाटल्या खरेदी केल्या होत्या. घरी जाऊन बिअर प्यायल्यानंतर त्यांची तब्येत अचानक खालावली. कुटुंबातील सदस्यांनी त्यांना त्वरित कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये दाखल केले, जिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
(नक्की वाचा- Mumbai News: पश्चिम उपनगरात 5 दिवस वाहतुकीत बदल, या मार्गांवरून प्रवास टाळा)
बिअर शॉपमध्ये सापडला एक्सपायरी साठा
अजय म्हात्रे यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांच्या काही मित्रांनी रियल बिअर शॉपमध्ये जाऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांना दुकानात काही प्रमाणात एक्सपायरी डेटची बिअर असल्याचे आढळल्या. याची माहिती त्यांनी तात्काळ कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना दिली. पोलिसांनी ही माहिती उत्पादन शुल्क विभागाला कळवली.
मंगळवारी सकाळी कल्याण उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी तात्काळ रियल बिअर शॉपमध्ये दाखल झाले. अधिकाऱ्यांनी बिअर शॉपमध्ये ठेवण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या दारूच्या साठ्याची कसून तपासणी केली. या तपासणीदरम्यान, उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मुदत संपलेल्या बिअरच्या बाटल्या सापडल्या. सध्या या बिअर शॉपमध्ये उत्पादन शुल्क विभागाने जप्तीची कारवाई केली आहे.
(नक्की वाचा- Hubli Pune Vande Bharat: पुणेकरांसाठी गुडन्यूज! हुबळी–पुणे एक्स्प्रेस आणखी एका स्टेशनवर थांबणार)
अजय म्हात्रे यांच्या मित्रांनी आणि परिसरातील नागरिकांनी एक्सपायरी डेटच्या मालाची विक्री करणाऱ्या अशा दुकानदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पोलिसांकडून या प्रकरणी काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world