ठाणे महापालिकेची पाणी बिल थकबाकी वसुलीकरता पाणी पुरवठा विभागाने कारवाई सुरू केली आहे. या वर्षी एप्रिल - 2025 पासून आतापर्यंत 43 कोटी रुपयांची पाणी बिल वसुली झाली आहे. हे प्रमाण एकूण वसुलीच्या सुमारे 18 टक्के आहे. थकबाकी वसुलीकरता सर्व प्रभाग समिती स्तरांवर मोहीम सुरू करण्यात आली असून पाणी बिलाची रक्कम वेळच्या वेळी भरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नक्की वाचा: निर्जल उपवासामुळे महिलेला स्ट्रोक; कोविड व्हॅक्सिनमुळेही धोका वाढल्याचा डॉक्टरांचा इशारा
100 टक्के वसुलीचे उद्दीष्ट्य खरंच पूर्ण होईल ?
महापालिकेची पाणी बिलाची एकूण रक्कम सुमारे 250 कोटी रुपयांच्या घरात आहेत. त्यापैकी, 92 कोटी 28 लाख रुपये थकबाकीपोटीचे आहेत. तर, चालू वर्षाची बिल रक्कम ही 157 कोटी, 80 लाख रुपये आहे. पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेने सन 2024-25 या वर्षात पाणी बिलांपोटी 148 कोटी 95 लाख रुपयांची वसुली करण्यात यश मिळवले होते. ही वसुली सन 2023-24 च्या तुलनेत 15 कोटी रुपयांनी अधिक होती. या आर्थिक वर्षात पाणी पुरवठा विभागाने थकबाकी आणि चालू बिलांची 100 टक्के वसुली करावी, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
वसुली मोहिमेचा दर आठवड्याला आढावा
अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्या मार्गदर्शनात पाणी बिल वसुली मोहीम राबवण्यात येत आहे. या वसुलीच्या मोहिमेचा आढावा पाणी पुरवठा विभागातर्फे दर सोमवारी घेतला जाणार आहे. त्यात अहवाल सादर न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात, मंगळवारी सायंकाळी मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे बैठक झाली. उपनगर अभियंता विनोद पवार यांनी या बैठकीत वसुलीची स्थिती आणि कारवाईचे स्वरुप याबद्दल मार्गदर्शन केले. या बैठकीस सर्व कार्यकारी अभियंता, उप अभियंता, मीटर रिडर आदी उपस्थित होते.
नक्की वाचा: नवी मुंबई विमानतळाबाबत मोठी अपडेट; पहिल्या टप्प्यात ही 5 शहरे जोडली जाणार
पाणीपुरवठा खंडीत करण्याचा इशारा
पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडीत करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर रुम सील करण्यात येत आहेत. तसेच, पाणी बिलाचा भरणा न करता, खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करुन घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचीही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली.