रिझवान शेख, प्रतिनिधी
Thane News : ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील हनुमान नगर भागात गेल्या काही दिवसांपासून भीतीचं वातावरण पसरलं आहे. या भागात बिबट्याचा वावर वाढल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. हा परिसर जंगलाला लागून असल्याने बिबट्या वारंवार मानवी वस्तीत शिरत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा बिबट्या लोकांच्या दाराच्या समोरून फिरत असताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये बिबट्या लोकांच्या घरासमोरून फिरताना दिसत आहे.
नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण...
ठाण्यातील वागळे इस्टेट येथील हनुमान नगर परिसराच्या अगदी जवळच डोंगर आणि दाट झाडी असल्याने बिबट्या भक्ष्याच्या शोधात वारंवार या भागात येत असल्याचं दिसून आलं आहे. येथील नागरिकांनी अनेकदा रात्रीच्या वेळी बिबट्याला फिरताना पाहिलं नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना रात्री-अपरात्री घराबाहेर पडणं अवघड झालं आहे.
बिबट्याच्या वावराची माहिती मिळताच वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे. बिबट्याचा वावर होत असल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरलं आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून बिबट्याचा शोध घेण्यात येत आहे. वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी लवकरात लवकर पिंजरा लावावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world